मराठी जगत Print

रेखा गणेश दिघे
दिल्लीत महाराष्ट्र महोत्सव २०१२ साजरा
(सुरेंद्र कुलकर्णी)
नवी दिल्ली येथील सार्वजनिक उत्सव समितीतर्फे दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान आयोजित केला जाणारा, महाराष्ट्र महोत्सव यंदाही मोठय़ा थाटामाटात व भरपूर प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. दिल्लीतील चार विविध ठिकाणी आयोजित या महोत्सवास मराठी तसेच अमराठी प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
महोत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात कामानी प्रेक्षागृहात राइट इव्हेन्ट्स संस्थेतर्फे निर्मित ‘गाता रहे मेरा दिल’ या मराठी हिंदी गीतांच्या सादरीकरणाने झाली, सुनील बापट यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत बाजपेयी, राणा चॅटर्जी, चिंतामणी आणि संगीता मयेकर या गायकांनी सादर केलेल्या गीतांना प्रेमकुमार यांच्या उत्तम निवेदनाने बहार आणली. त्यानंतर आनंद म्हसवेकर लिखित व दिग्दर्शित ‘दुधावरची साय’ या नाटय़प्रयोगातील कुलदीप पवार व फैय्याज या अनुभवी कलावंतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. केदार शिंदे यांनी निर्देशन केलेल्या ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकातील भरत जाधव यांच्या उत्तम अभिनयाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘हसा चकट फू’ या नावीन्यपूर्ण कार्यक्रमात सूत्रधार प्रणित कुलकर्णी यांनी भरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे यांना त्यांच्या कारकीर्दीच्या प्रगतीबाबत बोलते करून व प्रेक्षकांनाही त्यात सहभागी करून धमाल आणली. समारोहाची सांगता सिरी फोर्ट प्रेक्षागृहात ‘सारेगम’च्या लिटिल चॅम्प्स्नी सादर केलेल्या गीतांनी झाली.
वरील कार्यक्रमांव्यतिरिक्त अतुलकुमार उपाध्ये तसेच अरुंधती जोशी यांचे व्हायोलिन वादन, ए. राजा यांचे चित्रकलेतील प्रयोग, दीपाली काळे आणि शोभना साठे यांचा पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम तसेच सुनीता टिकरे, गिरीश पंचवाडकर, आकांक्षा पालकर, मेघना साने, हेमंत साने यांनी मराठी व हिंदी गीतांच्या मैफिली रंगविल्या.
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. व्ही. एस. सिरपुरकर आणि कंपनी लॉ बोर्डाचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. हा महोत्सव यशस्वी करण्यास लॅब इंडिया, टाटा उद्योगसमूह, महाराष्ट्र बँक तसेच अन्य राष्ट्रीयीकृत बँका, इतर खासगी तथा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी बहुमोल मदत केली, अशी माहिती महोत्सवाचे प्रमुख संयोजक रा. मो. हेजीब यांनी दिली.

बडोद्यातील पारंपरिक गणेशोत्सव
(विपीन प्रधान)
प्रो. माणिकरावांच्या उमा सभागृहात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला. यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत अनेक दिग्गजांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रथम पुष्प शर्मिला वीरकर यांनी गुंफले. ‘स्वामी विवेकानंद- एक प्रेरक व्यक्तिमत्त्व’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. ‘कथास्वाद’ या कार्यक्रमांतर्गत, कथाकथनाच्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयश्री जोशी यांची ‘देवमाणूस’ शीर्षक असलेली भावस्पर्शी कथा, डॉ. शरद सबनीस यांची ‘सारं कसं आकस्मिक’ ही शीर्षकाला अनुरूप असलेली कथा आणि श्याम कुलकर्णी यांनी सादर केलेली उद्घाटन ही विनोदी कथा अशा तिन्ही कथांचे सादरीकरण चांगल्या प्रकारे झाले. संस्थेचे व्यवस्थापक विश्वस्त विपीन प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपरोक्त संस्थेने केलेल्या भरीव कार्याचा आढावा घेत अधिकाधिक महिलांनी येथे सुरू असलेल्या महिला जिम्नॅशियमचा लाभ घ्यावा, त्याचप्रमाणे तरुणांनी मल्लखांबसारख्या व्यायामाकडे वळावे, येथील मल्लखांब व फिजिओथेरपी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.  म. स. विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू        डॉ. अनिल काणे यांचे ‘गीता- एक नवा विचार’ या विषयावरील प्रवचन प्रभावी ठरले. डॉ. संजय पंडित यांचे वैद्यकीय व्यवसायातील विनोद आणि त्यांचे स्वत:चे अनुभव खूपच रंगले. जयवंत लेले यांनी ‘ह्य़ुमर इन क्रिकेट’ या विषयावरील आपले अनुभव, काही आठवणी दिलखुलासपणे सांगितल्या.
कोलकाता मंडळातील गणेशोत्सवाचे  विविध रंग
(सूर्यकांत कुलकर्णी)
कोलकाता महाराष्ट्र मंडळात साजरा झाला. पहिल्याच दिवशी पं. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. अन्य दिवशी महापौर सोवन चॅटर्जी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोलकात्यात शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. बेलूर मठातील स्वामी तत्त्वज्ञानानंद यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. ह.भ.प. आदित्यबुवा देशकर यांनी संत एकनाथांवर कीर्तन केले. रोजच्या पुजेचे पौरोहित्य पं. नागेशशास्त्री जोशी यांनी केले.
‘अतुल्य भारत’ शीर्षकाचे बहारदार नृत्यनाटय़ मंडळातील लहानमोठय़ा ५४ सभासदांनी सादर केले. ‘आता प्रवास पुढे’ हा संगीतमय फॅशन शो आकर्षक होता. विविध कार्यक्रमात मुला-मुलींनी सिनेसंगीतावर आधारित नृत्ये पेश केली. रुपा रेगे, भारती हजारे, चारू प्रधान यांनी आपली गायनकला श्रींसमोर सादर केली. पुढील कार्यासाठी आनंद, उत्साह व ऊर्जेची शिदोरी देऊन गणरायांनी सर्वाचा भावपूर्ण निरोप घेतला.
व. पु. काळे यांच्या स्मरणार्थ कथाकथनाचा कार्यक्रम
(गीतेश भिसे)
मराठीचे ख्यातनाम व लोकप्रिय साहित्यिक कै. व. पु. काळे यांचे पुण्यस्मरण करण्याच्या उद्देशाने इंदूर महाराष्ट्र साहित्य सभेने काळे यांच्या कथांच्या, कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या प्रभावी लेखणीने साकार झालेल्या, समाज प्रबोधन करणाऱ्या निवडक चार कथा तांबे सभागृहात सादर करण्यात आल्या.
मध्यमवर्गीय व्यक्तीची मनोदशा व त्याच्या जीवनात येणाऱ्या अनेक ठिकाणी प्रसंगांना तोंड देताना सामाजिक व्यवस्थेचे आकलन करून व प्रभावी व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन त्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करता येईल, हे सुचविणारी ‘बदली’ ही कथा अपर्णा भागवत यांनी ओघवत्या शब्दात सादर केली.
आपले आयुष्य जगताना प्रत्येक माणूस काही स्वप्न पाहात असतो. ती स्वप्ने साकार व्हावीत म्हणून झटतही असतो. त्याची काही स्वप्ने त्याच्या प्रयत्नांनी संयोगाने किंवा ईशकृपेने साकारही होतात, परंतु काही मात्र तशीच राहून जातात. साकार झालेल्या स्वप्नांमुळे माणसाची ईश्वरावरची श्रद्धा दृढ होत जाते, हे निदर्शनास आणून देणारी ‘प्रचिती’ ही कथा माणिक भिसे यांनी प्रभावीरीत्या सादर केली.
हातचलाखी अन आभास निर्माण करून माणसाला चकीत अन भ्रमित करणारे जादूगार जगात अनेक झालेत, परंतु ईश्वराहून मोठा जादूगार, किमयागार, मदतगार कोणीच नाही हे विशद करून सांगणारी कथा म्हणजे ‘एका हाताने टाळी वाजवा.’ श्रीकांत तारे यांनी ही कथा मनोरंजक पद्धतीने सादर केली.
अघोषित धन लपविण्याकरिता कशा क्लृप्त्या योजाव्या लागतात. ही बाब सर्कशीतल्या वाघाचे उदाहरण देऊन स्पष्ट करणारी व्यंगात्मक कथा ‘वाघच, पण मी मिस्टर वाघ नाही’ मनीष खरगोणकर यांनी सहजरीत्या सादर केली.
अहमदाबाद येथे बृहन्महाराष्ट्राचे प्रांतीय अधिवेशन संपन्न
(आश्लेषा देशपांडे)
बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्लीचे प्रांतीय अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे संपन्न झाले. यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक पी. एन. देशपांडे, गुजरात काँग्रेसप्रमुख अर्जुन मोढवाढिया, गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते चेतन रावळ, भाजपचे भूषण भट्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अहमदाबाद महाराष्ट्र समाजाचे अध्यक्ष भोईटे व बृ. म. मंडळाचे अहमदाबादमधील प्रमुख नरेंद्र गोडवेलकर यांनी सर्व जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाची सुरुवात मीना मराठे व सुनयना पळसुले यांच्या सरस्वतीवंदनेने झाली. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आश्लेषा देशपांडे यांनी गुजरात प्रांताच्या गतिविधीविषयी माहिती सांगितली. गुजरातचे मुख्यमंत्री  नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या संदेशाचे वाचनही यावेळी करण्यात आले. यानिमित्त समाजातर्फे ‘वाटचाल’ या स्मरणिकेचे प्रकाशन, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे सचिव रवी गिऱ्हे यांनी मंडळाविषयी सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रात गुजरातमधील मराठी संस्थांचा परिचय करून देण्यात आला व या संस्थांच्या कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला. लावणी, भारूड, रास गरबा असा विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमही यानिमित्ताने सादर करण्यात आला.