सर्व सरकारी रुग्णालयांतून मोफत जेनेरिक औषधे देणार Print

पंतप्रधानांची माहिती : आरोग्य क्षेत्रासाठी १२व्या योजनेत तिप्पट वाढ
नवी दिल्ली
पीटीआय
आरोग्य क्षेत्रातील जटिल समस्यांची गंभीरपणे दखल घेण्याची गरज प्रतिपादित करताना पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी शनिवारी बाराव्या योजनेत या क्षेत्रासाठी तीन पटीने वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रामुख्याने स्वच्छता आणि पोषणयुक्त आहारावर हा निधी खर्च करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांतून गरिबांसाठी जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
येथील लेडी हरदिंगे वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुनर्उभारणी प्रकल्पाची कोनशिला पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या हस्ते ठेवण्यात आली. त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, ११व्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत १२व्या पंचवार्षिक योजनेत आरोग्य क्षेत्रासाठी तीन पटीने वाढ करण्यात आली आहे. रुग्णांवर औषधोपचारासाठी खर्च करताना गरीब वर्गाचे कंबरडे मोडले जाते. नाइलाजापोटी त्यांना पदरमोड करून ही औषधे खरेदी करावी लागतात. ही बाब लक्षात घेऊन सर्व सरकारी रुग्णालयांतून गरिबांसाठी जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करण्यात येतील, असे ते म्हणाले.