बराक ओबामा यांची अर्थविषयक धोरणे घातक Print

रोम्नी यांचा इशारा
पीटीआय
वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सहा नोव्हेंबर या दिवशी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून बराक ओबामा यांचे प्रतिस्पर्धी मिट रोम्नी यांनी आक्रमक प्रचारावर भर दिला आहे. ओबामा यांची अर्थविषयक धोरणे देशासाठी घातक असून मतदारांना ते पूर्ण न होणारी आश्वासने देत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ओहियो येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने बराक ओबामा पाळू शकले नाहीत, या वेळीही ते अशीच अशक्य कोटीतील आश्वासने देत सुटले आहेत, त्यांच्या घातक अर्थविषयक धोरणांमुळे अमेरिकेतील मंदीत भरच पडेल, असा दावा रोम्नी यांनी केला. आपला देश सध्या ज्या धोरणांच्या आधारे मार्गक्रमण करत आहे, तीच वाट भविष्यातही चोखाळली जाईल असे ते म्हणत आहेत, याचाच अर्थ आपल्यावरील कर्जाचे डोंगर वाढतच जाणार असे समजायचे का, सध्या आपल्यावर १६ दशकोटी अमेरिकी डॉलरचे कर्ज आहे, ओबामा यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ते २० दशकोटी डॉलपर्यंत जाण्याची भीती आहे, आपल्याला बेरोजगारीच्या समस्येनेही ग्रासले असून ओबामा यांच्या धोरणांमुळे यातही वाढ होईल, त्यामुळे मतदारांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
 आघाडीचे उद्योजक असणाऱ्या रोम्नी यांनी प्रचारात या व्यावसायिक यशाचाही उपयोग केला. ओबामा आश्वासने पाळू शकत नाहीत, मात्र उद्योजक या नात्याने दिलेली आश्वासने मी पूर्ण करून दाखवली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.      

चुरशीची लढत अपेक्षित
रोम्नी यांनी मोठे आव्हान उभे केल्याने ओबामा यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही, हे जनमत चाचणीतून स्पष्ट झाले आहे. एका जनमत चाचणीनुसार ओबामा यांनी रोम्नी यांच्यावर सध्या केवळ एक दशांश गुणांनी आघाडी घेतली आहे, तर अन्य एका चाचणीने केलेल्या दाव्यानुसार रोम्नी हे ओबामा यांच्यापेक्षा एका गुणाने पुढे आहेत. दोन्ही उमेदवारांनी प्रचारसभांचा धडाका लावल्याने उर्वरित दोन दिवसांत कोणाचा प्रचार अधिक प्रभावी ठरतो, त्यावर या निकालाचे भवितव्य ठरेल.