काँग्रेसचे आज महाशक्तिप्रदर्शन Print

एफडीआयच्या समर्थनार्थ ‘रामलीला’वर सोनियांची भव्य सभा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली
किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने रविवारी येथील रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन करीत शक्तिप्रदर्शनाची सज्जता केली आहे. केंद्रात दीर्घकाळ सत्तेत राहणारा काँग्रेस पक्ष प्रथमच आर्थिक सुधारणांच्या मुद्यांवर जाहीर सभेला सामोरे जात आहे. ज्या रामलीला मैदानावरून यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनी रणशिंग फुंकले, तेथूनच देशवासीयांपुढे आर्थिक सुधारणांच्या मुद्यांवर आपली बाजू आक्रमकपणे मांडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजविण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.  
या महारॅलीला देशभरातील काँग्रेसजन मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार असून त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रामलीला मैदानावर काँग्रेसला जनतेचा नेहमीच भरघोस प्रतिसाद मिळाला असून, रविवारीही काँग्रेस समर्थकांच्या गर्दीने तुडुंब भरेल, असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी व्यक्त केला.
या जाहीरसभेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे भावी ‘श्रेष्ठी’ राहुल गांधी यांच्यासह अ. भा. काँग्रेसचे पदाधिकारी, केंद्रीय मंत्री, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसच्या विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच देशभरातील महत्त्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. सभेत विद्यमान राजकीय स्थितीचा आढावा घेणारी सोनिया गांधी, पंतप्रधान आणि राहुल गांधी यांची भाषणे होतील. सभेपूर्वी सोनिया गांधींपाठोपाठ काँग्रेसमधील निर्विवाद क्रमांक दोनचे नेते म्हणून राहुल गांधी यांना महत्त्वाचे पद मिळण्याची दाट शक्यता होती, पण डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सोळाशे कोटी रुपये किमतीचे हेरॉल्ड हाऊस बळकावल्याचा आरोप ऐन मोक्याच्या वेळी केल्याने राहुल गांधी यांच्याविषयीची अपेक्षित महत्त्वपूर्ण घोषणा टळली.
पण किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या सरकारच्या धाडसी निर्णयावर विरोधक तुटून पडले असताना काँग्रेस पक्षाच्या इतिहासात प्रथमच आर्थिक मुद्यावर जनतेत जाऊन विरोधकांचे आरोप आक्रमकपणे खोडून काढण्याचे काँग्रेस नेतृत्वाने ठरविले आहे. या जाहीर सभेपाठोपाठ येत्या ९ नोव्हेंबर रोजी सूरजकुंड येथे अ. भा. काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रातील काँग्रेसच्या मंत्र्यांदरम्यान अनौपचारिक संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान राजकीय परिस्थितीव्यतिरिक्त देशापुढे असलेली आर्थिक आव्हाने आणि काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी या विषयांवर या संवाद बैठकीत चर्चा होईल. दीड वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पक्ष आतापासून लागला असल्याचे त्यातून ध्वनित होत आहे.