संयुक्त राष्ट्रांत होणार ‘आकाश’दर्शन Print

पीटीआय
संयुक्त राष्ट्रे, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

‘आकाश’ या जगातील सर्वात स्वस्त टॅबलेटला संयुक्त राष्ट्रांत प्रदर्शित करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात येत्या २८ नोव्हेंबरला ‘आकाश’ प्रदर्शित करण्यात येणार असून संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


‘आकाश’ची निर्मिती करणारे कॅनडामधील डाटाविंड कंपनीचे संचालक सुनीत सिंग सुरी संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधींसमोर या विषयाच्या माहितीचे सादरीकरण करतील. काही सदस्य देशांना मर्यादित संख्येत आकाशचा पुरवठा करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांना स्वस्त किमतीमध्ये टॅबलेट उपलब्ध करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने ‘आकाश’ची निर्मिती करण्यात आली आहे. डाटाविंड कंपनीला याबाबतचे टेंडर ऑक्टोबर २०१० मध्येच देण्यात आले होते. आकाशची किंमत ४९ अमेरिकी डॉलर्स (२४३६ रुपये) इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र खराब गुणवत्तेमुळे ‘आकाश’च्या पहिल्या आवृत्तीचे वितरण रद्द करण्यात आले. आता ‘आकाश’ची सुधारित आवृत्ती ११ नोव्हेंबरला भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.