काँग्रेसच्या रॅलीने दिल्ली जॅम Print

विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली
किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या समर्थनासाठी काँग्रेसने रविवारी आयोजिलेल्या महारॅलीमुळे दिल्लीतील बहुतांश रस्ते जॅम झाले होते.  ७० ते ८० हजार समर्थकांच्या गर्दीमुळे पावणे दोन तास चाललेल्या या महारॅलीमुळे रामलीला मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक साडेतीन तास ठप्प होती.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व बडे नेते आणि कार्यकर्त्यांचे आज रामलीला मैदानावर शक्तीप्रदर्शन घडवून घोटाळे, भ्रष्टाचार आणि वादग्रस्त घटनांनी घेरलेल्या काँग्रेसने विरोधकांना आक्रमकपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. तसेच या आरोपांनी आणि विरोधकांच्या टीकेने पिछाडीला गेलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढविण्याचा प्रयत्नही केला. या रॅलीद्वारे आर्थिक सुधारणांच्या निर्णयांचा काँग्रेसने प्रथमच जाहीर पुरस्कार केला.