काँग्रेसचा ‘एफडीआय’ला हात! Print

महारॅलीत मनमोहन सिंग, सोनिया व राहुल गांधींकडून आक्रमक समर्थन
विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली
किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक आणल्याने शेतकऱ्यांचे भले होईल, तरुणांना मोठय़ा प्रमाणावर रोजगार मिळण्यात हातभार लागेल आणि सर्वसामान्यांनाही त्याचा लाभ होईल, असा दावा करताना रविवारी दुपारी येथील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या महारॅलीला संबोधताना पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे भावी ‘आशास्थान’ राहुल गांधी यांनी केंद्रातील यूपीए सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांचा आक्रमकपणे पुरस्कार करीत विरोधी पक्षांवर, विशेषत भाजपवर कडाडून टीका केली.
काँग्रेस नेहमीच गरीब, आम आदमी, कमकुवत घटक, शेतकरी आणि कामगारांचा पक्ष राहिला आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांसह सर्वांना एका सूत्रात गुंफणाऱ्या काँग्रेसची त्याग, सेवा आणि राष्ट्रीय विकासाच्या बाबतीतील कामगिरी अतुलनीय ठरल्याचा दावा सोनिया गांधी यांनी केला. देशापुढे असलेल्या हरतऱ्हेच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जाऊन यश मिळविण्याचा आणि सार्थक तोडगा काढण्याचा काँग्रेसचा दृढसंकल्प जाहीर करण्यासाठी आजच्या जाहीरसभेचे आयोजन केल्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. आज सारे जग वित्तीय संकटात सापडले त्यापासून कोणताही देश वाचू शकत नाही. अन्य देशांच्या तुलनेत आमच्या आर्थिक विकासाचा वेग थांबलेला नाही. दरवर्षी देशात ८० लाख ते १ कोटी युवकांना रोजगार हवा असतो. जगातील कुठलाही देश एवढय़ा मोठय़ा आव्हानाला सामोरा जात नसावा. त्यासाठी नव्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे आणि थेट विदेशी गुंतवणूक त्याचा एक भाग आहे, असे त्या म्हणाल्या.
सोनिया गांधींनी विरोधी पक्षांवर विशेषत भाजपवर कडाडून हल्ला चढविला. लोकशाहीचा पाया कमजोर करण्यासाठी भाजप संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याचा, महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मुद्यांवर चर्चा होऊ देत नसल्याचा तसेच जनतेच्या कल्याणाचे कायदे पारित करू देत नसल्याचा त्यांनी आरोप केला. भाजपवाले भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर आम्हाला भाषण देतात, पण स्वतच भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसले आहेत. पण ते दुसऱ्यांवर खोटे आरोप लावण्यात मुळीच मागेपुढे पाहात नाहीत. पण जे दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतात, तो त्यांच्याचसाठी तयार असतो, असा टोला सोनियांनी लगावला. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषींची गय केली जाणार नाही आणि भाजपच्या विरोधानंतरही लोकपाल विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीवरून विरोधी पक्षांनी चालविलेल्या अपप्रचाराचा समाचार घेतला. मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी आर्थिक सुधारणा अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला कटु निर्णय घ्यावे लागत असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज आमच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांचे दावे खोटे ठरतील. एफडीआयमुळे अन्य देशांना फायदा झाला असून भारतातील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदाच होईल, असे ते म्हणाले. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा कटु निर्णय देशहिताखातर घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारचा दृढसंकल्प त्यांनी जाहीर केला.
देशाची सर्वात मोठी समस्या राजकीय प्रणाली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. सामान्य आणि कमकुवत घटकांसाठी राजकीय प्रणालीची दारे बंद झाली आहेत. सर्वसामान्यांचा सहभाग नसलेल्या या प्रणालीमुळेच देशाचा विकास होऊ शकला नाही याची जाणीव गेल्या आठ वर्षांंच्या राजकीय सक्रियतेतून आपल्याला झाली, असे राहुल गांधी म्हणाले. जगात भारतासाठी सकारात्मक वातावरण तयार होत असताना सरकारच्या प्रत्येक धोरणाचा विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
वाहतूक ठप्प
अनेक राज्यांतले बडे नेते, पदाधिकारी यांच्यासह ७० ते ८० हजार समर्थकांच्या गर्दीमुळे पावणे दोन तास चाललेल्या या महारॅलीमुळे रामलीला मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक साडेतीन तास ठप्प झाली होती.