ओबामा-रोम्नी फिफ्टी-फिफ्टी! Print

यस.. हू कॅन?

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारवर येऊन ठेपली असतानाच ५१ वर्षांचे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार व विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे ६५ वर्षांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन उमेदवार मिट रोम्नी यांना अखेरच्या जनमत चाचणीत प्रत्येकी ४८ टक्के मते मिळाली आहेत! जनमत चाचण्यांत व्यक्त झालेल्या कौलाचे पारडे उलटेपालटे होऊ शकते, यात शंका नसली तरी लोकांचे पाठबळ नेमके कुणामागे आहे, याचे गूढ वाढल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.
वॉशिंग्टन पोस्ट आणि एबीसी न्यूज यांनी ही राष्ट्रव्यापी संयुक्त जनमत चाचणी घेतली होती. यात दोन्ही नेत्यांना प्रत्येकी ४८ टक्के मते पडली. पक्षपाती धोरणांचे आरोप आणि मंदीमुळे आक्रसलेली अर्थव्यवस्था या आव्हानांचा सामना करणारे ओबामा यांनी गेली निवडणूक ‘यस वुई कॅन’चा मंत्र पुकारत जिंकली होती. अमेरिकेचे चित्र पालटण्याचीच हमी या मंत्रात होती. आता मात्र ओबामा यांना, माझे कार्य अर्धेच झाले असून त्याच्या पूर्तीसाठी मलाच निवडून द्या, असे सांगावे लागत आहे.
रिपब्लिकनांच्या सत्ताकाळातील चुकांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था अडचणीत आहे, असा आरोप ओबामा यांनी प्रचारसभांमध्ये केला आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला सक्षम आणि गतिमान करण्यासाठी अधिक मुदत ते मागत आहेत. रोम्नी मात्र त्यांचा दावा प्रभावीपणे खोडून काढत असून अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या गाडय़ाची दिशाच चुकीची झाली असून या अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी नेतृत्वबदलाला पर्याय नाही, असेच ठासून सांगत आहेत.
दोन्ही बाजूंनी लक्षावधी डॉलर्स प्रचारावर खर्च झाले असून यावेळचा प्रचार अनेकदा व्यक्तिगत पातळीवरील आरोप आणि टीकेनेही रंगला आहे. गंमतीचा भाग म्हणजे ओबामा यांच्या प्रचाराला रिपब्लिकनांचा कडवा धर्माग्रही स्पर्शही झाला आहे. एका प्रचाराच्या चित्रफितीत ओबामांनी आपल्या धर्मश्रद्धेविषयीचं ममत्व विस्तारानं सांगितलं असून आपल्या धोरणांना बायबलचा आधार कसा आहे, हेदेखील विशद केले आहे. सहा नोव्हेंबरची निवडणूक म्हणजे भविष्यात दमदार प्रवेशाची संधी असेल, असा प्रचार रोम्नी करीत आहेत. याआधी सीएननने केलेल्या जनमत चाचणीत ओबामा अवघे एका टक्क्याने रोम्नींच्या पुढे होते. ओबामांना ४८ तर रोम्नी यांना ४७ टक्के मते पडली होती. आताच्या ताज्या जनमत चाचणीत दोघांची मते प्रत्येकी ४८ टक्के झाली असली तरी याचा अर्थ गेल्या जनमत चाचणीच्या तुलनेत रोम्नी यांचा जनाधार वाढला आहे!
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ओबामा हे फ्लोरिडा, कोलॅरेडो आणि ओहियोचा दौरा करणार आहेत. अमेरिकेत आलेल्या सॅण्डी वादळग्रस्तांसाठी ओबामा यांनी केलेल्या कार्याचे मोजमापही मतदार मतदानाद्वारे व्यक्त करतील, अशी शक्यता आहे. या वादळग्रस्तांसाठी ओबामा यांनी केलेल्या कामाबाबत वॉशिंग्टन पोस्ट आणि एबीसी न्यूजने केलेल्या पाहणीत ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे ओबामा यांच्या विजयाबाबतचा डेमोक्रेटिक पक्षाचा आशावाद वाढला आहे.