नितीश कुमार यांचा ‘राग बिहार’ Print

वृत्तसंस्था
पाटणा, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२

बिहारला विशेष दर्जा द्यावा, ही मागणी दुर्लक्षित करीत केंद्र सरकार बिहारशी सापत्न भावाने वागत आहे, असा आरोप मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पाटण्यातील विराट ‘अधिकार रॅली’त केला. संयुक्त जनता दलाच्यावतीने महिनाभर राज्यव्यापी अधिकार यात्रा काढल्या गेल्या. त्यांचा समारोप पाटण्यातील गांधी मैदानात पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी कुमार बोलत होते.


बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीचा केंद्राने कधीच गांभिर्याने विचार केला नाही, असे नमूद करीत नितीश कुमार म्हणाले की, बिहार विधानसभेने २००९ मध्ये एकमताने तसा ठराव केला होता. त्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या भेटीची वेळही वारंवार मागितली पण त्यांना भेट दिली गेली नाही. आम्ही प्रत्येक व्यासपीठाच्या माध्यमातून हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. पण काहीही उपयोग झाला नाही.
बिहारला विशेष दर्जा मिळावा, या मागणीसाठी मार्च महिन्यात दिल्लीतील रामलीला मैदानावरही मेळावा होईल, अशी घोषणा त्यांनी केली.