ताज कॉरिडोर प्रकरणी मायावतींना दिलासा Print

alt

लखनऊ, ५ नोव्हेंबर २०१२
अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज (सोमवार) ताज कॉरिडोर गैरव्यवहार प्रकरणी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना दिलासा दिला आहे.
मायावती आणि त्यांचे सहकारी नसीमुद्दीन सिद्दिकी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एकूण सात जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. उत्तर प्रदेशातील ताज कॉरिडोर गैरव्यवहार प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज हा निर्णय सुनावला.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहाल परिसरातील जागा विकसित करण्याच्या दृष्टीने आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने २००२-०३ मध्ये ताज कॉरिडोर बनविण्यास सुरवात झाली होती. परंतू पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन केल्यामुळे आणि नंतर गैरव्यवहारामुळे हा प्रकल्प वादात अडकला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची चौकशी करण्यास सुरवात झाली. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चौकशीनंतर मायावती आणि नसीमुद्दीन सिद्दिकी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या. यांच्याविरुद्ध याचिका चालविण्यासाठी राज्यपालांकडे परवानगी मागण्यात आली, मात्र राज्यपालांनी नकार दिल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयानेही यांना या प्रकरणी निर्दोष ठरविले. आज न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळल्याने मायावतींना दिलासा मिळाला आहे.