मलालाच्या हल्लेखोराच्या बहिणीकडून क्षमायाचना Print

alt

पीटीआय, इस्लामाबाद
मलाला युसुफझाईवर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराच्या बहिणीने या प्रकाराबद्दल मलालाची माफी मागितली आहे. आपल्या भावाच्या या कृत्यामुळे आम्हा सर्वानी मान शरमेने झुकली आहे, असे तिने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांच्या अनिष्ट रुढींविरोधात आवाज उठवणाऱ्या व स्त्रीशिक्षणाबद्दल जनजागृती करणाऱ्या मलालावर नऊ ऑक्टोबर या दिवशी अताउल्ला खान या २३ वर्षीय तरुणाने डोक्यात गोळी झाडली होती. १५ वर्षीय मलालाची प्रकृती आता सुधारत असून तिच्यावर ब्रिटीश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एका कोवळ्या मुलीवर या प्रकारे हल्ला झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अताउल्ला खानच्या कुटुंबीयांना जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. या पाश्र्वभूमीवर त्याची बहिण हलीम हिने म्हटले आहे की, माझ्या भावाने जे दुष्कृत्य केले त्याबद्दल मी मलालाची माफी मागते, माझा हा संदेश कृपया तिच्यापर्यंत पोहोचवा, त्याचे हे कृत्य कोणत्याही प्रकारे समर्थनीय नसून आम्हा सर्वाची मान शरमेने खाली गेली आहे. आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आता लयाला गेली असून मी त्याला माझा भाऊ मानत नाही.’
मलाला ही मला माझ्या बहिणीसारखीच असून या प्रकरणी ती मला व माझ्या कुटुंबीयांना दोषी धरणार नाही, अशी आशा आपण करतो, असेही तिने नमूद केले.