पद्मनाभस्वामी मंदिराचा ताबा राजघराण्याकडे नको Print

डाव्यांची मागणी
पीटीआय, थिरुवनंतपूरम
प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्यातील संपत्तीचा ताबा येथील त्रावणकोर राजघराण्याकडे सोपवण्याच्या ‘न्याय मित्रा’च्या अहवालास मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार विरोध केला आहे. या मंदिराच्या काही कक्षांत अगणित संपत्ती व दागिने सापडल्यानंतर त्याच्या मालकीहक्कावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असून याबाबत अहवाल देण्यासाठी ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांची न्यायालयाकडून ‘न्याय मित्र’ या नात्याने नेमणूक करण्यात आली आहे. सुब्रमण्यम यांनी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला नुकताच सादर केला असून त्यावर डाव्या पक्षांनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयाला योग्य माहिती पुरवणे हे ‘न्याय मित्रा’चे काम असताना राजघराण्याचा निष्ठावान नोकर असल्याप्रमाणे सुब्रमण्यम यांनी अहवाल दिला आहे, त्यातील प्रस्ताव मान्य झाले तर या मंदिराचा ताबा व संपत्ती पूर्णपणे या राजघराण्याकडे जाईल, त्यांच्या या प्रस्तावामुळे न्यायालयाची दिशाभूल होत असून आम्ही त्यास विरोध करतो, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश चिटणीस पिनारायी विजयन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.