भ्रष्टाचाराला आळा घाला अन्यथा.. Print

मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांचा इशारा
बीजिंग, पीटीआय

‘भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला वेळीच आवर घाला अन्यथा हा भस्मासुर संपूर्ण देशाला गिळंकृत करेल’, असा इशारा दिला आहे मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांनी. पक्षाच्या बैठकीसाठी संपूर्ण देशभरातून आलेल्या २२७० कॉम्रेड्समोर निरोपाचे भाषण करताना जिंताओ यांनी चीनसमोरील अनेक आव्हानांचे चित्र मांडले.
‘सध्या भ्रष्टाचाराने देशाला पोखरले असून पक्षपातळीपर्यंत ही कीड फोफावली आहे. या भस्मासुराला वेळीच आवर घातला नाही तर संपूर्ण पक्षव्यवस्था आणि देश कोसळायला वेळ लागणार नाही अशा स्पष्ट शब्दांत जिंताओ यांनी इशारा दिला. पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांची बिलकूल गय करू नका. त्यांची सखोल चौकशी करा आणि दोषी आढळले तर कठोर शिक्षा करा’ असे जिंताओ म्हणाले. त्यांचा रोख पक्षातून हकालपट्टी झालेले सर्वोच्च नेते बो झिलाई यांच्याकडे होता. ‘सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून जनमत तापलेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनक्षोभ झाल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत पक्षाची राजकीय पकड सैल होण्याचा धोका आहे. मात्र, ही पकड मजबूत करणे ही काळाची गरज असून त्यातच चीनचे हित सामावले असल्याचे जिंताओ यांनी स्पष्ट केले.
पाश्चिमात्य लोकशाही नकोच
नवे सरकार अधिकाधिक खुले आर्थिक धोरण स्वीकारेल याचे संकेत देताना मात्र जिंताओंनी लोकशाहीला देशाची कवाडे कधीच खुली केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. पाश्चिमात्य लोकशाही चीनला कधीच नको होती आणि तिचा स्वीकार यापुढेही केला जाणार नाही असे ते म्हणाले.