पंतप्रधानपदाची अडवाणींना लालसा नाही! Print

वाढदिवशी अभिष्टचिंतन करून गडकरींनी घेतले आशीर्वाद
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधानपद पक्षापेक्षा मोठे नाही, असे उद्गार आज भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ८५वा वाढदिवस साजरा करताना काढले. भाजपच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असलेल्या अडवाणींच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि गेल्या काही दिवसांपासून उभय नेत्यांमधील दुरावा संपल्याचे संकेत दिले.
सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये अडवाणी यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा फलद्रूप  झाली नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारांमध्ये त्यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अडवाणी यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, अडवाणींनी हे विधान केले असले तरी त्यांची दावेदारी संपलेली नाही. पूर्ती प्रकरणावरून अडचणीत आलेले नितीन गडकरी व अडवाणी यांच्यातील ‘शीतयुद्धा’च्या अटकळींनाही आज विराम लागला. गडकरी यांची गच्छंती झाल्यास अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याची अडवाणी यांची इच्छा असल्याचे समजते. पण तसे घडण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गडकरींना क्लीन चिट देणाऱ्या भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीपासून अडवाणी लांब राहिले. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून गडकरीही अडवाणींना टाळत होते. पण आज अडवाणींचे अभिष्टचिंतन करण्यासाठी गडकरी त्यांच्या ३०, पृथ्वीराज रोड निवासस्थानी पोहोचले व पदस्पर्श करून त्यांनी अडवाणींचे आशीर्वाद घेतले. या वेळी त्यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाल्याचे समजते.