मोबाइल सेवा सुरू होणार? Print

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये मोबाइल सेवा सुरू करण्यास मान्यता दिल्याचे पाकिस्तानच्या संसदीय मंडळास अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, अद्याप या संदर्भात काही बाबींची पूर्तता करावी लागणार आहे, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
नॅशनल असेंब्लीच्या वाणिज्यविषयक स्थायी समितीमधील सदस्यांना माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी, दोन्ही देशांमध्ये मोबाइल सेवा सुरू करण्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र दोन्ही देशांमध्ये आधुनिक दळणवळण सुविधांचा अभाव असल्याबद्दल संसदीय मंडळाने खंत व्यक्त केली.भारत आणि पाकिस्तानमधील दूरदळणवळण कंपन्यांमधील तांत्रिक अडचणी ही यामधील मुख्य समस्या आहे. कारण दोन्ही देशांना आपापल्या संलग्न कंपन्यांकडून अथवा त्यांच्या मंडळांकडून यासाठी मान्यता घ्यावी लागणार आहे, असे वाणिज्य सचिव मुनीर कुरेशी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे, असे मत संसदीय मंडळातील काही सदस्यांनी व्यक्त केले.