कंबोडिया, म्यानमार, थायलंडचा दौरा Print

पी.टी.आय., वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर बराक ओबामा या महिनाअखेरीस आपला पहिला परदेश दौरा दक्षिण आशियामधील बर्मा, कंबोडिया, थायलंड या राष्ट्रांपासून सुरू करणार आहेत. त्यांच्यासमवेत या दौऱ्यामध्ये संरक्षण सचिव लिओन पॅनेटा आणि परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटनदेखील सहभागी होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. दक्षिण आशियासंबंधी ओबामा प्रशासनाच्या बदलत्या दृष्टिकोनाचा दाखलाच या प्रस्तावित भेटीमुळे समोर आला आहे.
१७ ते २० नोव्हेंबर रोजी कंबोडिया येथे होणाऱ्या पूर्व आशियाई राष्ट्रांच्या शिखर परिषदेमध्ये ओबामा सहभागी होणार आहेत. त्यानंतर बर्मा आणि थायलंड या राष्ट्रांना ते भेट देणार असल्याचे व्हाइट हाऊसतर्फे स्पष्ट करण्यात आले. थायलंडच्या पंतप्रधान यिंगलक यांची भेट घेऊन ओबामा उभय राष्ट्रांमधील १८० वर्षांच्या जुन्या राजनैतिक मैत्रीला वृद्धिंगत करणार असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी स्पष्ट केले.  म्यानमारचे (बर्मा) अध्यक्ष आणि लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांची भेट या दौऱ्याचे मुख्य आकर्षण असून, तेथे ते आपले विचार मांडणार आहेत. आर्थिक प्रगती, व्यापारवृद्धीतून तयार होणारी रोजगारनिर्मिती, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य, मानवी हक्क, प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवर या भेटीमध्ये आशियाई राष्ट्रांशी चर्चा होणे अपेक्षित असल्याचेही कार्नी यांनी नमूद केले.
  भारतासोबत संबंध दृढ करण्यास इच्छुक
 वॉशिंग्टन: आशिया खंडात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्र म्हणून अमेरिका भारतासोबतचे संबंध वृद्घिंगत करण्यास इच्छुक असल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव लिओन पॅनेटा यांनी आशिया भेटीच्या पाश्र्वभूमीवर स्पष्ट केले. भारत हे संपूर्ण आशिया खंडात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्र आहे. पॅनेटा यांनी यापूर्वीच भारताला भेट देऊन संरक्षणविषयक धोरणांवर फलदायी चर्चा केली आहे. यापुढे भारतासोबतचे संबंध आणखी वृद्घिंगत करण्यावर अमेरिकेचा भर असेल, असे पॅण्टेगॉनचे प्रवक्ते जॉर्ज लिटिल  यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार वाढण्याबाबत अमेरिका प्रयत्नशील असेलच, पण त्याचबरोबर सुरक्षेसंदर्भातील मैत्रीही आणखी वाढलेली असेल, असा विश्वास लिटिल यांनी व्यक्त केला.