इंडोनेशियामध्ये पुराचे ११ बळी Print

जकार्ता : गेल्या दोन दिवसांपासून इंडोनेशियामध्ये पावसाने हैदोस घातला असून पुरामुळे ११ नागरिकांचा मृत्यू तर २०हून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नदीकिनाऱ्यावर असलेल्या सुलावेसी बेटांवरील ममासा जिल्ह्य़ामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे जीवित आणि वित्त हानी झाल्याची माहिती सरकारी प्रवक्त्यांनी दिली. भूस्खलनामुळे नदीच्या प्रवाहांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे नदीकिनारी असलेली अनेक घरे वाहून गेली. ११ मृतदेह सापडले असून जीवित हानी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भागात मदतपथके तातडीने रवाना झाली आहेत. इंडोनेशियामध्ये एकूण १७ हजार बेटे असून वर्षांतील सहा महिने पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडतात. लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकावर असलेल्या या राष्ट्रांमधील कोटय़वधी नागरिकांना पुराशी दोन हात करण्यासाठी सदैव सज्ज राहावे लागते.