सुसान राईस होणार हिलरींच्या उत्तराधिकारी? Print

वॉशिंग्टन: संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत सुसान राईस ह्यांचे नाव अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. विद्यमान परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी आपले पद सोडण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे. राईस यांची परराष्ट्रमंत्रीपदी निवड झाल्यास त्या कोंडालिसा राईस यांच्यानंतर अमेरिकेच्या पराराष्ट्रमंत्री होणाऱ्या दुसऱ्याच आफ्रिकी-अमेरिकी महिला ठरतील. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये ओबामा प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणांची आक्रमक मांडणी करणाऱ्या अधिकारी ही राईस यांची मुख्य ओळख. लिबियातील तत्कालीन हुकूमशाह गडाफी यांच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोरांना अमेरिकेने मदत करण्यास त्यांनी पाठिंबा दिला होता. लिबियामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करण्यासंदर्भातील सुरक्षा परिषदेचा ठराव समंत करण्यामध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओबामांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा यापूर्वीच दिला आहे. राईस यांच्या प्रमाणेच सिनेटच्या परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख जॉन केरी आणि सुरक्षा सल्लागार टॉम डोनिलिओन हे देखील परराष्ट्रमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.