भारताच्या पराभवास धोनी जबाबदार - चेतन शर्मा Print

पी.टी.आय., नवी दिल्ली
श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताच्या पराभवास कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चुकीची संघनिवड कारणीभूत असल्याचे भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी म्हटले आहे. ‘‘माझ्या मते संपूर्ण संघालाच या पराभवाचा दोष देता कामा नये. भारताच्या सुमार कामगिरीस धोनीच जबाबदार आहे. धोनीने आपली चूक मान्य करून भारताच्या पराभवासाठी पावसाला जबाबदार धरू नये,’’ असे चेतन शर्मा यांनी सांगितले.
सुपर-एट फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी धोनीने अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगला संघात स्थान न देण्याची चूक केली. हरभजनला संघातून वगळणे, हा माझ्यासाठी धक्काच होता. कसोटीत ४०० बळी मिळवणाऱ्या अनुभवी हरभजनला संघात स्थान मिळायलाच हवे होते. धोनीने आपल्या मर्जीतील खेळाडूंना संघात समाविष्ट करून घेतले, त्याचप्रमाणे हरभजनलाही अंतिम संघात खेळवायला हवे होते, असा आरोप शर्मा यांनी केला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर एका धावेने विजय मिळवला तरी उपांत्य फेरीत मजल मारण्यात भारताला अपयश आले. पाकिस्तानने सरस धावगतीच्या आधारे भारताला मागे टाकून उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र धोनीने या पराभवाचे खापर पावसावर फोडले आहे.