संघ म्हणून सिद्ध करण्यात आम्ही अपयशी ठरलो! Print

कर्णधार धोनीने केले भारताच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण
क्रीडा प्रतिनिधी , कोलंबो
सुपर-एटमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दोन दिग्गज संघांना हरवूनही सरासरीचे समीकरण न सांभाळता आल्यामुळे मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले. ‘‘खेळाच्या सर्व विभागांमध्ये एक संघ म्हणून सिद्ध करण्यात आम्ही अपयशी ठरलो,’’ अशा शब्दांत भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीने संघाच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण केले.
भारताने सुपर-एटमधील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एक चेंडू आणि एका धावेने मात केली, पण भारताला उपांत्य फेरीत पोहोचविण्यासाठी हा विजय पुरेसा नव्हता. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३१ धावांनी विजय मिळवणे आवश्यक होते; परंतु धोनीने भारतीय संघाच्या एकंदर कामगिरीबाबत समाधान प्रकट केले. ‘‘संघ म्हणून आम्ही सिद्ध होऊ शकलो नाही. आमची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे विविध प्रसंगी चमकदार झाले, परंतु खेळातील या तिन्ही विभागांमध्ये आम्ही कोणत्याही सामन्यात सांघिकपणे यशस्वी झालो नाही. परंतु संघाच्या एकूण कामगिरीबाबत मी समाधानी आहे,’’ असे धोनीने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचे उदाहरण घ्या. पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याचे चित्र पालटले. आमची कामगिरी चांगली झाली, परंतु अन्य संघाच्या कामगिरीप्रमाणे आम्ही सामन्यावर योग्य नियंत्रण मिळवू शकलो नाही,’’ असे धोनी या वेळी म्हणाला.
भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीलाही धोनीने याप्रसंगी जबाबदार धरले. धोनी म्हणाला की, ‘‘डावाची चांगली सुरुवात ही नेहमी महत्त्वाची असते. या स्पध्रेत प्रत्येकदा दहा षटकांच्या आतच भारताचे पहिले दोन-तीन फलंदाज तंबूत परतायचे. या कारणास्तव १५व्या षटकानंतर धावांचा वेग वाढविणे कठीण जायचे. त्यामुळे भारताच्या धावफलकावर नेहमीच १०-१५ धावा कमी लागल्या. अखेरच्या षटकांमध्ये भरपूर धावा काढणारे फलंदाज आपल्याकडेही आहेत, पण मैदानावर तसे प्रत्यक्षात घडू शकले नाही.’’