.. आणि हाफीझ झाला भावुक! Print

कोलंबो : तीन वर्षांपूर्वी लाहोरमधील गदाफी स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर जागतिक क्रिकेटमधील कोणताही संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊ धजावलेला नाही. पाकिस्तानी क्रिकेटरसिकांचे आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याचे भाग्य तेव्हापासून नशिबाने हिरावून घेतले आहे. परंतु तरीही पाकिस्तानी क्रिकेट संघ परदेशात किंवा दुबईच्या त्रयस्थ ठिकाणी पराक्रम दाखवत आहे. संघाच्या या यशस्वी कामगिरीविषयी बोलताना पाकिस्तानचा कप्तान मोहम्मद हाफीझ क्षणभर भावुक झाला. तो म्हणाला, ‘‘पाकिस्तानचे क्रिकेट गेली तीन वष्रे फार कठीण परिस्थितीतून जाते आहे. याही परिस्थितीत आम्ही सर्व जण सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करीत चांगले निकाल देत आहोत. ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे.’’
‘‘उपांत्य फेरीत पोहोचलेला प्रत्येक संघ सर्वोत्तम आहे. श्रीलंकेचा संघही चांगला आहे. या स्पध्रेत आमच्या संघाने अनेक चढउतार पाहिले आहेत. पण काही सकारात्मक निकाल मिळाले, त्याचे समाधान नक्कीच आहे,’’ असे हाफीझ यावेळी म्हणाला. ‘‘सईद अजमल, रझा हसन आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासारखे दर्जेदार फिरकी गोलंदाज आमच्याकडे आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी अनुकूल अशी फिरकी गोलंदाजी आमच्याकडे असल्यामुळेच पाकिस्तानला या प्रकारात चांगले यश मिळते आहे,’’ अशी प्रतिक्रिया हाफीझने व्यक्त केली.