भारत ‘अ’ संघ सुस्थितीत Print

पी.टी.आय., लिनकोन
मनदीप सिंग व अशोक मणेरिया यांनी केलेली नाबाद शतके तसेच त्यांनी केलेली २९४ धावांची अखंडित भागीदारी यामुळेच भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत क्रिकेट कसोटीत ४ बाद ४३३ असा धावांचा डोंगर रचला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची ४ बाद १३९ अशी स्थिती होती मात्र त्यानंतर मनदीप व मणेरिया यांनी मनमुरादपणे फटकेबाजी केली. मनदीप याने तडाखेबाज खेळ करीत नाबाद १६९ धावा केल्या तर मणेरिया याने शैलीदार फलंदाजी करीत नाबाद १६४ धावा केल्या.
भारताची सुरुवात खराब झाली. अभिनव मुकुंद (१२) व उनमुक्त चंद (७) हे सलामीवीर केवळ ३१ धावांमध्ये तंबूत परतले. त्यानंतर मनदीपने अनुस्तुप मजुमदार याच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भर घातली. ब्रेन्ट अर्नेल याने मजुमदारला बाद करीत ही जोडी फोडली. मजुमदार याने झकास खेळ करीत ५६ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव याचीही विकेट भारताने गमावली. त्यानंतर मनदीपच्या साथीत मणेरिया हा खेळावयास आला आणि ही जोडी झकास जमली. मणेरियाने केवळ ९० चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने २१ चौकार व दोन षटकारांसह नाबाद १६४ धावा केल्या. मनदीपने २० चौकार व एका षटकारासह नाबाद १६९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून अर्नेल याने ७० धावांमध्ये तीन गडी बाद केले त अँडी मकाय याने ११६ धावांमध्ये एक गडी बाद केला.