आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धासाठी आता नवीन नियमावली Print

क्रीडा प्रतिनिधी , मुंबई
आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धासाठी नवीन नियमावली करण्यात आली असून, पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आंतरराष्टीय नेमबाजी महासंघाने पुढील तीन वर्षांसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्याबाबतची माहितीपुस्तिका त्यांनी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. पूर्वी अंतिम फेरीतील गुण मोजताना प्राथमिक फेरीतील गुणही मोजले जात असत. आता नवीन नियमांनुसार अंतिम फेरीतील गुणांचाच विचार केला जाईल. शून्य गुणापासूनच हे गुण सुरू होतील. त्यामुळे अंतिम फेरीत स्पर्धकास आणखी जास्त कौशल्य दाखवावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय महासंघाच्या विविध समित्यांनी सुचविलेल्या बदलांचा विचार करूनच ही नियमावली करण्यात आली आहे. स्पर्धा अधिक चुरशीची व प्रेक्षकांसाठी आकर्षक व्हावी यादृष्टीने काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. १९८६ नंतर प्रथमच नेमबाजी स्पर्धाच्या नियमांमध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या दुरुस्त्यांबाबत अनेक ठराव आले होते. त्यांचा विचार करून हे बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनाही नेमबाजीचे निकाल घेणे सोपे जाणार आहेत. तसेच प्रेक्षकांनाही स्पर्धेविषयी अधिक उत्कंठा वाटणार आहे.
रॅपिड फायर प्रकारात अंतिम फेरीकरिता बाद पद्धतीचा उपयोग करण्यास २०११ पासून सुरुवात करण्यात आली होती. हा बदल लोकप्रिय ठरल्यामुळे अन्य प्रकारातही अंतिम फेरीत शून्यापासून गुण मोजण्यास सुरुवात केली जाणार आहे.