एकता बिश्तची हॅट्ट्रिक, Print

भारताचा श्रीलंकेवर विजय
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा
पी.टी.आय., कोलंबो
डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिश्त हिने घेतलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने महिलांच्या आयसीसी ट्वेन्टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्लेऑफ सामन्यात श्रीलंकेला नऊ गडी राखून हरविले. या विजयामुळे भारताने २०१४ मध्ये होणाऱ्या ट्वेन्टी२० विश्वचषक स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे.  
बिश्त हिच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेस २० षटकांत ८ बाद १०० धावांवर रोखले. चामरी अट्टापट्टू (२८) व कर्णधार शशिकला सिरीवर्धने (२३) या दोन फलंदाजांचा अपवाद वगळता लंकेच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली. बिश्त हिने शेवटच्या षटकात हॅट्ट्रिक घेतली. बिश्त हिने प्रथम दुलानी सुरांगिका (१०) हिला बाद केले. एन.निरंजना हिने दुलानीचा झेल घेतला. पाठोपाठ बिश्त हिने येसोदा मेंडिस हिचा स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेतला. ईशानी कौसल्या हिला खाते उघडण्यापूर्वीच बिश्तने तंबूत धाडले. झुलान गोस्वामी हिने हा झेल घेतला.
भारताने विजयासाठी असलेले १०१ धावांचे आव्हान केवळ एका गडय़ाच्या मोबदल्यात व ३२ चेंडू राखून पार केले. त्याचे श्रेय पूनम राऊत व कर्णधार मिताली राज यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ६४ धावांच्या अखंडित भागीदारीस द्यावे लागेल. पूनम हिने शैलीदार खेळ करीत पाच चौकारांसह नाबाद ४५ धावा केल्या. मिताली हिने दमदार खेळ करीत चार चौकारांसह नाबाद २८ धावा केल्या.