शारापोवाचा धडाकेबाज विजय Print

चीन खुली टेनिस स्पर्धा
पी.टी.आय., बीजिंग

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मारिया शारापोवा हिने चीन ओपन टेनिस स्पर्धेत धडाकेबाज विजयासह आगेकूच राखली. तिने सोराना सिरस्टी हिचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडविला. शारापोवा हिने आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत सोराना या रुमानियाच्या खेळाडूला फारशी संधी दिली नाही. तिने दोन्ही सेट्समध्ये परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला तसेच नेटजवळून तिने कल्पकतेने प्लेसिंग केले. तिने सव्‍‌र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. शारापोवाबरोबरच मारियाना बातरेली हिनेदेखील अपराजित्व राखले. तिने जर्मनीची खेळाडू ज्युलिया जॉर्जेस हिच्यावर ६-३, ७-६ असा विजय मिळविला. पहिल्या सेटमध्ये तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला व ज्युलियाची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. तिने सव्‍‌र्हिसवरही नियंत्रण मिळविले होते. दुसऱ्या सेटमध्ये ज्युलिया हिने संघर्षपूर्ण खेळ केला. ६-६ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये मात्र बातरेली हिने वर्चस्व राखून विजयश्री संपादन केली.
अ‍ॅना इव्हानोव्हिच हिला मात्र पराभवाचा धक्का बसला. स्वित्झलर्ंडची उदयोन्मुख खेळाडू रोमिना ओपरेन्डी हिने तिच्यावर ६-४, ६-३ असा विजय मिळविला. तिने क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला तसेच अचूक सव्‍‌र्हिसेसही केल्या.
 येलेना यांकोवीच हिचे आव्हानही संपुष्टात आले. नॅव्हेरो सोरेझ हिने तिचा ७-५, ६-४ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला. दोन्ही खेळाडूंनी परतीचे फटके व सव्‍‌र्हिस यावर नियंत्रण राखले होते. मात्र दोन्ही सेट्समध्ये सोरेझ हिने सव्‍‌र्हिसब्रेकच्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला व विजयश्री मिळविली. तिने बेसलाईनवरून व्हॉलीजचा कल्पकतेने उपयोग केला व महत्त्वाच्या क्षणी यांकोवीच हिचा बचाव निष्प्रभ केला.