बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेडचे विजय Print

चॅम्पियन्स लीग फुटबॉल
ए.पी., जिनिव्हा

बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी आणि मँचेस्टर युनायटेडचा रॉबिन व्हॅन पर्सी यांनी शानदार कामगिरी करीत आपापल्या संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत विजय मिळवून दिले. मेस्सीने सहाव्या मिनिटाला आणि ५५व्या मिनिटाला गोल करण्याच्या संधी निर्माण केल्यामुळे अनुक्रमे अ‍ॅलेक्सी सान्चेझ आणि सेस्क फॅब्रेगस यांनी गोल केले. त्यांच्या या गोलमुळे बार्सिलोनाने बेनफिका संघावर २-० अशी मात केली. बार्सिलोनाने सहज विजय मिळवला तरी कर्णधार कार्लोस प्युयोलच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. सर्जी बस्केट्सने त्याला धडक दिल्यामुळे बस्केट्सला लाल कार्ड दाखवण्यात आले.
व्हॅन पर्सीच्या दोन गोलांच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने सीएफआर क्लज संघाचे आव्हान २-१ असे परतवून लावले. व्हॅन पर्सीने २९व्या आणि ४९व्या मिनिटाला गोल केले. गतविजेत्या चेल्सी संघाने नॉर्दसलँड संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. गेल्या मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या बायर्न म्युनिचने बेट बोरिसोव्ह संघावर ३-१ अशी मात केली. व्हॅलेन्सियाने लिली संघावर, तर ब्रागाने गलाटासराय संघावर २-० असा विजय मिळवला. सेल्टिक फुटबॉल क्लबने ९०व्या मिनिटाला केलेल्या गोलाच्या जोरावर स्पार्टक मॉस्को संघाचा ३-२ असा पाडाव केला.