सेहवागच्या पायाला दुखापत Print

चॅम्पियन्स लीग स्पर्धेला मुकण्याची शक्यता
क्रीडा प्रतिनिधी, कोलंबो

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्या पायाचा घोटा दुखावल्यामुळे डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेला तो मुकण्याची शक्यता आहे. सुपर-एट फेरीमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सेहवागला घोटय़ाचा त्रास जाणवत होता. भारतीय संघाचे प्रसिद्धी व्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा यांच्या मते, सेहवागला डॉक्टरांनी किमान १४ दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. चौथ्या षटकांत इरफान पठाणच्या गोलंदाजीवर जॅक कॅलिस बाद झाल्याचा आनंद व्यक्त करताना सेहवागची दुखापत उफाळून आली. त्यानंतर उपचारासाठी मैदानाबाहेर गेलेला सेहवाग पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी उतरलाच नाही. त्याची जागा मनोज तिवारीने घेतली.
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी करणाऱ्या सेहवागने तीन सामन्यांत अवघ्या ५४ धावा केल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रमुख खेळाडू असलेल्या सेहवागच्या दुखापतीचा संघाला मोठा फटका बसणार आहे. दक्षिण आफ्रिकेत ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेतील दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी १३ ऑक्टोबरला होणार आहे.