सायली गोखले, कश्यप विजेते Print

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा
पी.टी.आय., श्रीनगर

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पुण्याच्या सायली गोखले हिने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत विजेतेपद पटकाविले. पुरुषांमध्ये ऑलिम्पिकपटू परुपल्ली कश्यप विजेता ठरला. चुरशीने झालेल्या अंतिम लढतीत सायली हिने पी.व्ही.सिंधू हिच्यावर २१-१५, १५-२१, २१-१५ अशी मात केली. सायली हिला द्वितीय मानांकन होते. तिने ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला. पहिल्या गेममध्ये तिने सिंधू हिला नमविले. मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूने खेळावर नियंत्रण ठेवले. तिने सायली हिच्या चुकांचा फायदा घेतला व ही गेम घेतली. १-१ अशा बरोबरीमुळे तिसऱ्या गेमविषयी उत्कंठा निर्माण झाली. तथापि या गेममध्ये पुन्हा सायलीने प्रभावी खेळ केला. तिने दोन्ही कॉर्नरजवळ प्लेसिंग करीत सिंधू हिला आघाडी मिळविण्यापासून वंचित ठेवले व ही गेम जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पुरुषांच्या अंतिम लढतीत कश्यप याने सरळ दोन गेम्समध्ये अजय जयराम याचे आव्हान परतविले. त्याने हा सामना २१-१८, २१-१७ असा जिंकला. दोन्ही गेम्समध्ये जयरामविरुद्ध गुण मिळविण्यासाठी कश्यपला संघर्ष करावा लागला. त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच अचूक सव्‍‌र्हिसही केल्या.
अपर्णा बालन हिने दुहेरी यश संपादन केले. तिने मिश्रदुहेरीत अरुण विष्णू याच्या साथीत विजेतेपद मिळविले. या जोडीने अंतिम फेरीत अश्विनी पोनप्पा व के.वरुण यांचा २१-१३, १८-२१, २१-१५ असा पराभव केला.
महिलांच्या दुहेरीत अपर्णा हिने सिकी रेड्डी हिच्या साथीत अजिंक्यपद मिळविले. त्यांनी एकतर्फी अंतिम सामन्यात वर्षां बेलवडी व जी.एम.निश्चिता यांना २१-११, २१-१३ असे पराभूत केले.