पाकिस्तानच्या पराभवाला शाहीद आफ्रिदी जबाबदार! Print

माजी क्रिकेटपटूंची टीका
पी.टी.आय., कोलंबो

श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या पराभवाला शाहीद आफ्रिदी जबाबदार असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटूंनी केला आहे.  मात्र पाकिस्तानचे माजी कर्णधार वासिम अक्रम यांनी खेळपट्टीला दोष दिला आहे.
आफ्रिदीने याआधीच निवृत्ती घ्यायली हवी होती. त्याची संघात निवड करायची आणि त्याने काही वर्षांपूर्वी करत होता तसाच सुमार खेळ करायचा असे आता चालणार नाही. आफ्रिदीसह अन्य काही खेळाडूंनी भवितव्याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे माजी खेळाडू आकिब जावेद याने सांगितले.
वासिम अक्रम म्हणाला, ‘‘श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी योग्य नव्हती. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे निव्वळ अशक्य होते. खेळभावनेला साजेशी ही खेळपट्टी नव्हती. इतक्या मोठय़ा सामन्यासाठी अशी खेळपट्टी पाहून मी आश्चर्यचकित झालो.’’
सर्फराझ नवाझ याच्या मते, ‘‘संघात तो महत्त्वाच्या भूमिकेत आहे, पण त्याची कामगिरी या भूमिकेला साजेशी नाही. निवड समितीने आफ्रिदीला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.’’
‘‘आफ्रिदी अनुभवी खेळाडू आहे, पण त्याचे पाठीचे दुखणे बळावल्याने तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. या दुखापतीमुळेच त्याच्या प्रदर्शनावर विपरीत परिणाम झाला,’’ असे माजी लेगस्पिनर मुश्ताक अहमद याने सांगितले.
मोहसिन खान म्हणाले, ‘‘उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यासाठी अशा प्रकारची खेळपट्टी बनवणे चुकीचे आहे. अशा खेळपट्टीमुळे नाणेफेक कोण जिंकणार याचाच फैसला होतो.’’
‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेट हा मनोरंजनाचा प्रकार आहे. मोठे फटक्यांची आतषबाजी बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. कमी धावसंख्येचे सामने कसोटीत योग्य आहेत पण ट्वेन्टी-२० प्रकारासाठी नाहीत,’’ असे माजी क्रिकेटपटू अब्दुल कादिर यांनी सांगितले.