क्रिकेटचं मंदिर! Print

पी. केणिंगा

क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारं कोलंबोच्या ‘क्रिकेट क्लब कॅफे’ अर्थात ‘सीसीसी’इतकं दुसरं कोणतंही स्थान नसावं. क्वीन्स रोडवरील हा जुना बंगला आता क्रिकेटप्रेमींचं आवडतं ठिकाण बनलं आहे. देशविदेशातील अनेक मंडळी या रेस्टॉरंटमध्ये टीव्हीवरील क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेत क्रिकेटच्याच वातावरणात आपल्या आवडीच्या पदार्थाचा आणि पेयांचा आनंद लुटतात. सचिन सॉसेजेस अ‍ॅन्ड मॅश, गांगुलीज ग्रिल, मुरली मुलीगश, महेला मोईशिवा, डि’सिल्व्हा कोलंबो बर्गर अशा गाजलेल्या क्रिकेटपटूंच्या नावाशी नातं जोडलेल्या अनेक डिशेस तुम्हाला उपलब्ध असतात. या ठिकाणचे वातावरण साधारण ऐतिहासिक असेच आहे. लंबक असणारे रोमन आकडय़ांचे जुने घडय़ाळ, जुन्या काळातील फर्निचर, बैठकीची रचना आणि प्रकाशव्यवस्था हे सारं काही आपल्याला काही दशके आधी घेऊन जातं. एवढय़ावरच हे थांबत नाही. हॉटेलच्या चहुबाजूला क्रिकेटमधील चिरंतन क्षणांच्या फ्रेम्स, ग्लोव्हज, स्वाक्षरी असलेल्या बॅट्स असा एक प्रकारचा खजिनाच तुमच्यासमोर उलगडत जातो. गॅरी सोबर्सने सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकण्याची किमया साधलेली बॅट तुमचं सहज लक्ष वेधून घेते. याशिवाय अ‍ॅशेस दौऱ्याच्या अनेक आठवणी छायाचित्रे आणि वृत्तपत्रांच्या कात्रणांच्या स्वरूपात भिंतींवर आपलं स्थान टिकवून आहेत. १९२० आणि १९४८च्या अ‍ॅशेस मालिकांचा इतिहास त्यामुळे
जिवंत होतो. याशिवाय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रमचे टी-शर्ट एका काचेच्या कपाटात आहेत. याचप्रमाणे एक अख्खी भिंत ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमनच्या स्मृतिचित्रांनी सजली आहे. तसेच १९९६च्या विश्वविजेतेपदासहित श्रीलंकेच्या क्रिकेटमधील अनेक यादगार क्षणही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या वातावरणात आपण क्रिकेटच्या एखाद्या मंदिरात तर आलो नाही ना, अशीच भावना मनात निर्माण होते.
‘क्रिकेट क्लब कॅफे’ ही संकल्पना जेम्स आणि गॅब्रिएल व्हाइट या ऑस्ट्रेलियन जोडप्याची. या जोडप्याला हॉटेल व्यवसाय आणि क्रिकेट असा दोन्हीमध्ये रस होता. श्रीलंकेतील मंडळींना आणि येथे येणाऱ्या प्रवाशांनाही क्रिकेटविषयी विलक्षण प्रेम आहे. या पाश्र्वभूमीवर क्रिकेटवर आधारित एक संकल्पनायुक्त रेस्टॉरंट बांधण्याचे या दोघांनी ठरवले. १९९६मध्ये व्हाइट दाम्पत्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात आलं. लोकांनी या संकल्पनेला मनापासून दाद दिली.
गॅब्रिएल व्हाइट सांगत होती, ‘‘आम्ही बरीच वष्रे या साऱ्या क्रिकेटविषयक गोष्टी जमा केल्या. १९४८मध्ये डॉन ब्रॅडमनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं इंग्लिश भूमीवर जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या काळातील वृत्तपत्राची कात्रणं मिळवण्यासाठी आम्ही एक वर्षभर वृत्तपत्राच्या कार्यालयात खेपा घातल्या, तेव्हा ती कात्रणं उपलब्ध झाली.’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘क्रिकेटला कोणत्याही सीमारेषा नसतात. श्रीलंका, भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये क्रिकेट हा जीवन-मृत्यूचा प्रश्न असतो. आम्हीही हे एकप्रकारे क्रिकेटचं प्रेम जपलं आहे.’’
क्रिकेटचा ठेवा जपणाऱ्या व्हाइट दाम्पत्याची भेट लक्षात राहणारी ठरली. अनेक देश-विदेशातील क्रिकेटपटुसुद्धा या कॅफेला आवर्जून भेट देतात. ते जेव्हा रेस्टॉरंटमध्ये शिरतात तेव्हा या साऱ्या वातावरणात हरखून जातात. त्यामुळे क्रिकेट क्लब कॅफेमधून बाहेर पडताना प्रत्येकाचा चेहरा प्रसन्न असतो. कारण एका देवळात क्रिकेटमधील अनेक देवांचं दर्शन त्यानं घेतलेलं असतं.