आता श्रीलंकेला रोखणे कठीण आहे! Print

श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुरलीचे ठाम मत

‘‘१९९६च्या विश्वविजेतेपदाने आम्हा खेळाडूंना आणि श्रीलंकेच्या क्रिकेटला संजीवनी मिळाली. आम्ही विश्वचषक जिंकल्यामुळे सर्व देश आम्हाला घाबरू लागले. त्याआधीपर्यंत कोणत्याही सामन्यात वा स्पध्रेत श्रीलंकेला सहज हरविता येईल, अशीच त्यांची विचारसरणी असायची. विश्वचषकजिंकल्यानंतर बाकीचे देश आमच्याकडे आदराने पाहू लागले!’’ ..कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी आठशे बळींचा एव्हरेस्ट उभारणारा श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन जेव्हा हे सांगत होता तेव्हा अनेक संस्मरणीय क्षण त्याला आठवले. आता श्रीलंकेचा संघ ट्वेन्टी-२० जगज्जेतेपदाच्या उंबरठय़ावर असताना मुरली कमालीचा भावुक झाला आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटला जागतिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील संघात मुरलीही सामील होता. ‘‘माझ्या आयुष्यातील तो सर्वात मोलाचा क्षण मी मानतो. त्या क्षणाचे शब्दांत वर्णन करता येत नाही. जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकता, तेव्हा हृदयात जपलेले एक सुवर्णस्वप्न साकारल्यामुळे आनंदाला पारावार नसतो. विश्वचषक जिंकणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मी श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करीन, असे मला कधीच वाटले नव्हते. पण जेव्हा देशाकडून खेळायला सुरुवात केली, तेव्हा विश्वचषक जिंकायचे, हाच निर्धार केला. माझे स्वप्न प्रत्यक्षात साकारले,’’ अशा शब्दांत मुरलीधरनने १९९६च्या विश्वविजेतेपदाच्या आठवणी ताज्या केल्या. भारताविषयी विलक्षण आपुलकी जपणाऱ्या मुरलीधरनशी केलेली खास बातचीत-
  alt
श्रीलंकेचा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तुझ्या काय भावना आहेत?
श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरी गाठल्यामुळे मी अत्यंत भावुक झालो आहे. विश्वविजेतेपदाच्या प्रवासात आम्हाला पाकिस्तान हा एकमेव अडसर होता. या  संघाचीच आम्हाला धास्ती होती. परंतु गुरुवारी आम्ही पाकिस्तानला आरामात हरवले. आता श्रीलंकेच्या संघाला रोखणे कठीण आहे. श्रीलंकेच्या संघाची कामगिरी चांगली होते आहे. संघही चांगला आहे. माझ्या मते श्रीलंकेला जगज्जेतेपदासाठी ९० टक्के संधी आहे, तर प्रतिस्पर्धी संघाला १० टक्के असेल.
 भारत आणि श्रीलंकेमधील क्रिकेट सामने चालू असतानाच्या वातावरणाचा तू कसा फरक स्पष्ट करशील?
भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमधील मंडळी क्रिकेट या खेळावर आणि क्रिकेटपटूंवर जिवापाड प्रेम करतात. त्यामुळे आपल्या देशाच्या सामन्यांना क्रिकेटरसिक मोठी गर्दी करतात. पण महत्त्वाचा फरक जो मला जाणवला तो म्हणजे श्रीलंकेत एखाद्या कार्निव्हलप्रमाणे वातावरण असते. गुरुवारी जेव्हा पाकिस्तानला हरवून श्रीलंका अंतिम फेरीत पोहोचली, तेव्हा फक्त स्टेडियमवरच नव्हे तर रस्त्यारस्त्यांवर हा जल्लोष मध्यरात्री सुरू होता.
  आयपीएल, एसपीएल यांसारख्या क्रिकेट स्पर्धाचा ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या विकासाला कितपत फायदा होतो?     
आयपीएल, एसपीएल या स्पर्धामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेट अधिक लोकप्रिय झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खेळाच्या वाढीत सिंहाचा वाटा आयपीएलचा आाहे. अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धाकरिता सज्ज होण्यासाठी या स्पर्धामध्ये योग्य व्यासपीठ मिळते.
  आशियातील खेळपट्टय़ांवर फिरकीच्या बळावर कोणत्याही संघाला नतमस्तक करता येते, याबाबत तुझे मत काय आहे?
आशियातील खेळपट्टय़ांवर फिरकीचे प्रभुत्व नेहमीच सिद्ध होते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे आशियाई संघ फिरकीच्या बळावर दिग्गज प्रतिस्पर्धी संघाशी आत्मविश्वासाने सामोरे जातात. आशियाई देशांच्या कर्तबगारीत फिरकीचा मोठा वाटा आहे, असे मी मानतो.
  ट्वेन्टी-२० क्रिकेट हे प्रामुख्याने फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांचे क्रिकेट. यात फिरकीची भूमिका काय आहे, असे तुला वाटते?
ट्वेन्टी-२० क्रिकेट हे जसे फलंदाजांचे क्रिकेट आहे, तसेच ते गोलंदाजांचेही क्रिकेट आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचीही भूमिका प्रत्येक सामन्यात महत्त्वाची असते. फलंदाजाला धावांपासून रोखणे, त्याला चकविणे आणि बाद करणे आदी अनेक गोष्टी फिरकी गोलंदाजीच्या बळावर साधता येतात. फिरकी गोलंदाजांनी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. श्रीलंका, पाकिस्तान, भारत यांच्याशिवाय ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड यांच्यासारख्या संघांनाही फिरकीचे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील महत्त्व चांगलेच ज्ञात आहे.
  भारताच्या फिरकी गोलंदाजीविषयी तुझे काय मत आहे?
भारतात फार चांगल्या दर्जाच्या फिरकी गोलंदाजांची निर्मिती होते. अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि आर. अश्विन यांच्यासारख्या गोलंदाजांसमवेत मी खेळलोही आहे. या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने अश्विन मला भेटायला होता. अश्विनला उज्ज्वल भविष्य आहे. भारतीय संघात अश्विन आणि हरभजन हे दोन जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहेत.