आता भारतात फॉम्र्युला ‘ई’ चा थरार Print

पी.टी.आय., नवी दिल्ली

फॉम्र्युला वनच्या थरारानंतर भारतीय चाहत्यांना फॉम्र्युला ‘ई’ सीरिजचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेतील पहिली स्पर्धा २०१४ मध्ये होणार आहे. भारताने गतवर्षी फॉम्र्युला वन ग्रां.प्रि. शर्यतीचे यशस्वीरीत्या आयोजन केले होते. आगामी सहा महिन्यांत वर्ल्ड सुपरबाईक्स चॅम्पियनशिपचे भारतात पर्दापण होणार आहे. तसेच जीटीवन सीरिजच्या शर्यतींचे येथे आयोजन करण्याचाही विचार केला जात आहे. आंतरराष्ट्रीय फॉम्र्युला असोसिएशनने फॉम्र्युला ई होल्डिंग्ज कंपनी व फॉम्र्युला ई सीरिज यांच्याशी करार केला आहे. या सीरिजमध्ये दहा संघांचा सहभाग राहील.
फॉम्र्युला ई सीरिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेझांद्रो अगाग यांनी सांगितले, भारतात फॉम्र्युला शर्यतींची अफाट लोकप्रियता आहे तसेच अशा शर्यतींकरिता प्रायोजकही मिळतात हे लक्षात घेऊनच आम्हाला या सीरिजमधील शर्यतींचे भारतात आयोजन करावयाचे आहे. कोठे या शर्यती आयोजित करायच्या याबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. मात्र लवकरच हा निर्णय होईल.
येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटचे मालक असलेल्या जेपीएसआय कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, फॉम्र्युला ई सीरिजची संकल्पना चांगली आहे आणि अशा शर्यती आयोजित करण्यास आम्ही सदैव तयार आहोत.