कर्नाटकला सर्वसाधारण विजेतेपद Print

वीरधवल खाडे आणि रिचा मिश्रा सर्वोत्तम खेळाडू
वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, पुणे

कर्नाटकने पुरुष विभागातील सांघिक विजेतेपदासह (१५० गुण) वरिष्ठ गटाच्या ६६ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची (२७२ गुण) कमाई केली. यजमान महाराष्ट्रास महिलांच्या सांघिक विजेतेपदावर (१५७ गुण) समाधान मानावे लागले. वीरधवल खाडे (महाराष्ट्र) व रिचा मिश्रा (पोलिसदल) यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात सर्वोत्तम जलतरणपटूचा मान मिळविला. शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत वीरधवल या बीजिंग ऑलिम्पिकपटूने शेवटच्या दिवशी १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ५०.५३ सेकंदात पार करीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याने एरॉन डिसूझाचा गतवर्षीचा ५१.१५ सेकंद हा विक्रम मोडताना जागतिक स्पर्धेची पात्रताही (५०.६४ सेकंद) पूर्ण केली. त्याने ५० मीटर व २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीतही जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण केली आहे. बीजिंग ऑलिम्पिकपटू संदीप शेजवळ याने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनिट ३.१० सेकंदात जिंकली. त्याने येथे ५० मीटर व २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण केली आहे. या विभागात शुक्रवारी झालेल्या २०० मीटर बटरफ्लायमध्ये एरॉन डिसूझा (२ मिनिटे १.४७ सेकंद) तर १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सौरभ संगवेकर (१५ मिनिटे ५५.८१ सेकंद) या दोन्ही कर्नाटकच्या खेळाडूंनी सुवर्णवेध घेतला.
महिलांमध्ये अपेक्षेप्रमाणे रिचा मिश्रा हिने पाच सुवर्णपदकांसह सर्वोत्तम खेळाडूचा किताब मिळविला. महिलांच्या २०० मीटर बटरफ्लायमध्ये कर्नाटकच्या पूजा अल्वा (२ मि.२४.०३ सेकंद) हिने विजेतेपद मिळविले तर १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत दिल्लीच्या प्रियांका प्रियदर्शनी हिने एक मिनिट १६.७६ सेकंद असा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. तिने एम.राघवी हिने गतवर्षी नोंदविलेला एक मिनिट १८.५५ सेकंद हा विक्रम मोडला. १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत गोव्याच्या तलाशा प्रभु (५९.७१ सेकंद) हिने सुवर्णपदक जिंकले.
वॉटरपोलोमध्ये महिलांच्या अंतिम लढतीत केरळने बंगालचा ३-० असा पराभव केला. महाराष्ट्राने पोलीस दलास ३-१ असे हरवित तिसरे स्थान घेतले. पुरुषांच्या अंतिम लढतीत सेनादलाने रेल्वे संघावर ७-५ अशी मात केली. महाराष्ट्राने पोलीस दलास ८-७ असे पराभूत करीत तिसरा क्रमांक मिळविला. डायव्हिंगमध्ये सेनादलाने २९ गुणांसह पुरुष विभागात सांघिक विजेतेपद मिळविले. महिलांमध्ये रेल्वे संघाने २१ गुणांसह विजेतेपद मिळविले.