दोलायमान! Print

सचिन घेणार पुनर्आढावा
पी.टी.आय. , नवी दिल्ली

मी निवृत्तीचा विचार करण्यापेक्षा सध्या खेळाचा आनंद लुटतोय, असे आजवर छातीठोकपणे सांगत टीकाकारांची तोंडे बंद करणाऱ्या ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर पहिल्यांदाच निवृत्तीचे विचार डोकावत असल्याचे संकेत दिले आहेत. अर्थात, ज्या क्षणी माझ्याकडून त्या तोडीची खेळी होत नाही, असे मला जाणवेल त्याक्षणी मी निवृत्त होईन, असे सांगत निवृत्तीची निश्चित कालमर्यादा ठरली नसल्याचेच त्याने स्पष्ट केले आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी क्रिकेटला देण्यासारखे माझ्यात अधिक काही नसल्याने नोव्हेंबरमध्ये मी माझ्या भविष्यातील खेळीचा फेरविचार करणार आहे, असे तो म्हणाला.
गेल्या कित्येक वर्षांपासून चर्वितचर्वण केला जाणारा निवृत्तीचा प्रश्न दस्तुरखुद्द सचिननेच ऐरणीवर आणला आहे. मात्र इतक्यात निवृत्ती घेण्याचा त्याचा विचार नाही. तो म्हणतो, ‘‘निवृत्तीचे विचार डोक्यात घोळत असले तरी नोव्हेंबर महिन्यात मैदानावर उतरल्यानंतर माझे हृदय सांगेल तो निर्णय मी घेईन. पण २३ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेणे कठीण आहे. निवृत्त होताना ध्येयपूर्तीचा अनुभव घेता न आल्याने निवृत्तीचा क्षण माझ्यासाठी खडतर जाणार आहे. त्यावेळी आतला आवाज काय सांगेल, यावरूनच माझा निवृत्तीचा निर्णय ठरणार आहे.’’
‘‘वयाच्या ३९व्या वर्षी माझा दृष्टिकोन आणि शरीर कशी साथ देते, यावरून मी यापुढे खेळायचे की नाही ते ठरवेन. संघासाठी अपेक्षित योगदान देऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यावर मी योग्य निर्णय घेईन. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे, असे जाणवताच मी निवृत्त होईन. आयुष्यात फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचाच विचार केल्यामुळे एके दिवशी क्रिकेटला अलविदा करणे मला भावनिकदृष्टय़ाही जड जाणार आहे,’’ असे सचिनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
‘‘गेल्या काही काळापासूनच निवृत्तीचे विचार माझ्या मनात घोळत होते. मी वयाच्या चाळीशीपर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मला शरीर साथ देईलच असे नाही. त्यामुळे आतल्या आवाजाची हाक मी ऐकणार आहे,’’ असेही सचिनने स्पष्ट केले. गेल्या वर्षी भारताने मायदेशातच विश्वचषक जिंकला तो क्षण सर्वोत्तम असल्याचे सांगत सचिनने २०१५ विश्वचषक स्पर्धेत खेळण्याच्या चर्चेचा इन्कार केला. ‘‘पुढील विश्वचषक स्पर्धेत मी खेळणे शक्य होणार नाही. त्यामुळे मी सध्या एका वेळी एका मालिकेचाच विचार करणार आहे. संघासाठीही ते फायद्याचे ठरेल. जास्तीत जास्त काळ देशाचे प्रतिनिधित्व करणे, हे माझे स्वप्न होते. देशासाठी खेळणे, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. आपल्या कारकीर्दीदरम्यान यशाची शिखरे गाठावीत, असे अनेकांना वाटते. ज्या दिवशी मी खेळणे थांबवेन, त्या दिवशी मी सर्वोत्तम कामगिरी करूच शकणार नाही. पण मी कधी निवृत्त होईन, हे सांगता येणे कठीण आहे,’’ असे सचिन म्हणाला.
सचिनबद्दल माजी क्रिकेटपटुही उलटसुलट प्रतिक्रिया देत असल्याबद्दल छेडता तो म्हणाला, लोक माझ्याबद्दल काय बोलतात, यापासून मी स्वतला नेहमीच दूर ठेवतो. माझ्या लहानपणापासूनच तशी सवय मला आहे. माझ्या भावानं मला प्रथम हा सल्ला दिला. लोकांच्या स्तुती किंवा टीकेत अडकण्यापेक्षा आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यावर आणि खेळ सुधारण्यावरच मी भर देतो.