बरसात की एक रात! Print

 

* ख्रिस गेल ठरला ऑसी गोलंदाजांचा कर्दनकाळ
* वेस्ट इंडिजच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलिया नतमस्तक
* रविवारी वेस्ट इंडिज-श्रीलंका यांच्यातील विजेता ठरणार जगज्जेता
* ख्रिस गेल  * नाबाद ७५   * चेंडू-४१   * चौकार-५  * षटकार-६

शुक्रवारची रात्र साक्षात ‘बरसात की एक रात’च होती. त्याचे दोन भले-बुरे रंग क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी १४ षटकार आणि १३ चौकारांची ‘बरसात’ करीत धावफलकावर दोनशेचा टप्पा ओलांडला, तेव्हाच डॅरेन सॅमीच्या सेनेने अर्धी लढाई जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कॅरेबियन गोलंदाजांपुढे अक्षरश: शरणागती पत्करली. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसात ऑस्ट्रेलियाने जपलेले जगज्जेतेपदाचे स्वप्न वाहून गेले. तब्बल ७४ धावांनी ऑस्ट्रेलियाला हरविल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या खास ‘कॅलिप्सो’ नृत्याच्या शैलीत विजयाचा जल्लोष साजरा केला.

१९८३च्या एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून त्यांची मक्तेदारी झुगारून दिली होती. त्यानंतर सुमारे २९ वष्रे एकदिवसीय असो किंवा ट्वेन्टी-२० कोणत्याही विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत वेस्ट इंडिजला अंतिम फेरीचे दर्शन घडले नव्हते. आता रविवारी रात्री श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अंतिम सामन्यातील विजेता चौथ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरेल.
‘आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग असतो,’ असे म्हटले जाते. ख्रिस गेल या कॅरेबियन बेटावरील ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील महानायकाच्या शब्दकोशात ‘बचाव’ हा शब्दच नाही. पण शुक्रवारी जॉन्सन चार्लस्, मार्लन सॅम्युएल्स, ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्ड यांची डोळ्यांचे पारणे फेडणारी फलंदाजी पाहता या साऱ्यांनीच आक्रमणाचा ‘गेल’मार्ग स्वीकारल्याचे सहज जाणवत होते. काचेचा आरसा जमिनीवर पडावा आणि त्याच्या असंख्य तुकडय़ांतून एकच प्रतिमा दिसाव्यात, तसेच काहीसे ऑसी गोलंदाजांचे झाले होते. वेस्ट इंडिजचा प्रत्येक फलंदाज कांगारूंवर तुटून पडत होता. गेलने ५ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकारांची आतषबाजी करीत नाबाद ७५ धावांची खेळी साकारली. याशिवाय ड्वेन ब्राव्होने एक चौकार आणि तीन षटकारांनिशी ३७ धावा केल्या, तर किरॉन पोलार्डने फक्त १५ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह ३८ धावा केल्या. डोहर्टीच्या अखेरच्या षटकात पोलार्डने तीन सलग षटकार खेचले. त्यामुळेच वेस्ट इंडिजला ४ बाद २०५ ही यंदाच्या विश्वचषक स्पध्रेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदविता आली.
यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत ऑस्ट्रेलियाचा अश्वमेध रोखणे कठीण असल्याचे पहिल्या सामन्यापासून स्पष्ट झाले. पण पाकिस्तानने सुपर-एटमधील अखेरच्या सामन्यात फिरकीचा फॉम्र्युला वापरून ऑस्ट्रेलियाचा रथ रोखण्याची किमया साधली होती. पाकिस्तानची हीच ‘आयडियाची कल्पना’ अमलात आणीत विंडीजने सॅम्युएल बद्री आणि मार्लन सॅम्युएल्स असा दोन्ही बाजूंनी फिरकीचा मारा पहिली सहा षटके ऑसी संघावर गेला. या सापळ्यात अडकून कांगारूंनी डेव्हिड वॉर्नर, माइक हसी आणि शेन वॉटसन हे हुकमी एक्के गमावले. त्यानंतर सातव्या षटकात वेगवान गोलंदाज रवी रामपॉलकडे सॅमीने चेंडू दिला. रामपॉलनेही मग कॅमेरून व्हाइट आणि डेव्हिड हसी यांना तंबूची वाट दाखवली.
आठव्या षटकात विंडीजचा अव्वल फिरकी गोलंदाज सुनील नरिनने मॅथ्यू व्ॉडला बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ६ बाद ४३ अशी केविलवाणी अवस्था झाली. त्यानंतर कप्तान जॉर्ज बेलीने कमिन्ससोबत सातव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या आशेचा दीप तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण १३१ धावांवर ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांचा दिवा पूर्णपणे विझला. बेलीने २९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकार यांच्या साह्याने ६३ धावांची झुंजार खेळी साकारली. मात्र बाकी कोणत्याही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला विंडीजच्या गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. रामपॉलने १६ धावांत ३ बळी घेतले, तर बद्री, नरिन आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. ख्रिस गेललाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीच्या चेहऱ्यावर हास्य होते. ‘‘आम्ही आखलेली रणनीती यशस्वी ठरली. गेल आणि आघाडीच्या फळीने पाया रचला, त्यानंतर गोलंदाजांनी कळस चढवला,’’ अशी प्रतिक्रिया सॅमीने सामन्यानंतर व्यक्त केली. तथापि, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेली म्हणाला की, ‘‘आम्ही पूर्णत: निष्प्रभ ठरलो. गेलला बाद करण्यासाठी कोणती व्यूहरचना वापरावी, हेच आम्हाला कळत नव्हते.’’
 संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : २० षटकांत ४ बाद २०५ (ख्रिस गेल नाबाद ७५, किरॉन पोलार्ड ३८, ड्वेन ब्राव्हो ३७; पॅट कमिन्स २/३६) विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया : १६.४ षटकांत सर्वबाद १३१ (जॉर्ज बेली ६३, माइक हसी १८; रवी रामपॉल ३/१६, किरॉन पोलार्ड २/६, सुनील नरिन २/१७)
सामनावीर : ख्रिस गेल.