संक्षिप्त क्रिडावृत्त Print

दुलीप करंडक : शिखर धवनचे शानदार शतक
चेन्नई : सलामीवीर शिखर धवनचे शैलीदार शतक व त्याने राहुल दिवाणच्या साथीत केलेल्या शतकी भागीदारीमुळेच दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर विभागाने पश्चिम विभागाविरुद्ध आश्वासक सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर उत्तर विभागाने ८९.२ षटकांत ३ बाद २५१ धावा केल्या. धवनने १०१ धावा केल्या. धवन-दिवाण जोडीने १६४ धावांची सलामी दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर सनी सिंग व नितीन सैनी यांनीही आत्मविश्वासाने फलंदाजी करीत ७६ धावांची भर घातली.     

क्रिकेट : मुकुंदचे शतक, कसोटी अनिर्णीत
लिनकोन : भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील दुसरी अनधिकृत कसोटी अनिर्णीत सुटली. भारताचा कर्णधार अभिनव मुकुंदने नाबाद १३२ धावांची खेळी केली. दोन सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णितावस्थेत संपली. चौथ्या दिवशी २ बाद ११९ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला आधार दिला तो मुकुंदच्या शतकाने. मुकुंदने १७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १३२ धावांची खेळी केली. भारताने ४ बाद २४६ वर आपला डाव घोषित केला.     

कलमाडींच्या हकालपट्टीची आयओसीची शिफारस
नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक महासंघावरून (आयओए) सुरेश कलमाडी, व्ही. के. वर्मा व ललित भानोत यांची त्वरित हकालपट्टी करण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओसी) नीतिमूल्य समितीने केली आहे. या तीनही पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असल्यामुळे त्यांना आयओएच्या आगामी निवडणुकांमध्ये कोणतेही पद भूषविता येणार नाही, अशीही आयओसीने शिफारस केली आहे. आयओएची निवडणूक २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.     

कबड्डी : मुंबई उपनगर संघ जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने जालना येथे ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या २४व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई उपनगरचे संघ जाहीर करण्यात आले. किशोर गट : हरेश कोंडविलकर (कर्णधार) रुपेश पालव, लहू बनसोडे, ऋषीकेश जाधव, सुशांत मोरे, सुयेश शिंदे, मैत्रिक सारंग, विशाल तांबे, दिवेश चव्हाण, आकाश सोळंकी, दिपेश चिकने, केतन कळवणकर. प्रशिक्षक : पांडुरंग कोकरे. किशोरी गट : मयुरी मोहिते (कर्णधार, दिपा बुर्टे, अंकिता मरगजे, अक्षंदा म्हात्रे, सृष्टी चाळके, मोनिका सावंत, कोमल तावडे, नंदिनी बुर्टे, रिद्धी सावंत, चैताली शिंदे, मयूरी पवार, प्रणाली कणसे. प्रशिक्षक : सचिन गुजर.     

कॅरम : अभिषेक भारती, मैत्रेयी गोगटे अजिंक्य
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित ४८व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या अभिषेक चौधरीने वरुण गोसावीला १२-१४, २१-४, १७-९ असे नमवत १८ वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावले. १८ वर्षांखालील मुलींमध्ये मैत्रेयी गोगटेने धुळ्याच्या मयूरी भामरेला २०-१२, १२-१० असे हरवत जेतेपदावर नाव कोरले. १२ वर्षांखालील मुलांमध्ये सिद्दार्थ महापात्राने तर १२ वर्षांखालील मुलींमध्ये नेहा पटेलने जेतेपद पटकावले. दीप जोशीने १४ वर्षांखालील मुलांमध्ये, तर राधिका जोशीने १४ वर्षांखालील मुलींमध्ये जेतेपदावर नाव कोरले.