२०११ विश्वचषकातील भारत-पाकिस्तान लढत कारकीर्दीतील सर्वात उत्कंठावर्धक -टॉफेल Print

पी.टी.आय.
कोलंबो
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान २०११ विश्वचषकात झालेला उपांत्य फेरीचा सामना कारकीर्दीतील सगळ्यात उत्कंठावर्धक असल्याचे उद्गार ऑस्ट्रेलियन पंच सायमन टॉफेल यांनी काढले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतर टॉफेल निवृत्त होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते.
‘भारत-पाकिस्तान दरम्यानचा तो सामना विशेष असाच होता. दोन्ही देशांचे पंतप्रधान सामन्याला उपस्थित होते. तो केवळ क्रिकेटचा सामना नव्हता. त्या विश्वचषकात दोन अंतिम सामने झाले. हा उपांत्य फेरीचा सामना आणि प्रत्यक्ष अंतिम मुकाबला’, असे टॉफेल सांगतात.  ‘मुंबई येथे झालेली भारत-इंग्लंड कसोटी तब्येतीने साथ सोडल्यामुळे अत्यंत कठीण गेली. कसोटीचे पाचही दिवस पोटाच्या दुखण्याने उचल खाल्ली होती,’ असे टॉफेल यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या टॉफेल यांनी या प्रसंगामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलल्याचे सांगितले. त्या अपघातातून मी खूप काही शिकलो. माझा प्राधान्यक्रम बदलला. त्या दुर्दैवी हल्ल्यातून मी सुखरूप राहिलो याचे समाधान आहे, असे ते म्हणाले.