‘रेड दी हिमालय’चा थरार आजपासून रंगणार Print

शिमला ते लेह १८०० कि.मी. चालणार स्पर्धा
प्रसाद लाड
शिमला
दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या पर्वत रांगा.. एका बाजूला डोंगरावरून दरड कोसळण्याची भीती, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी.. खडकाळ रस्ते.. वळणावळणाचे घाट.. दिवसा उन्हाने शरीराची होणारी काहिली आणि सूर्यास्तानंतर शुष्क होणारं वातावरण.. अशा शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींची कसोटी पाहणाऱ्या १४ व्या ‘मारुती-सुझुकी रेड दी हिमालय’ या थरारक स्पर्धेला रविवारपासून सुरुवात होत आहे.
 ७ ते १२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा शिमला ते लेहपर्यंत  रंगणार आहे. १८०० किमीच्या या स्पर्धेत एकूण २६० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे, ज्यामध्ये १४ विदेशी स्पर्धकांचाही समावेश आहे. चारचाकी (कार्स)च्या स्पर्धेत ‘अ‍ॅडव्हेंचर’ (साहसी) आणि ‘एक्स्ट्रिम’(खडतर) असे दोन गट करण्यात आले आहेत, ज्यामध्ये साहसी प्रकारात ६० आणि खडतर प्रकारात ५० गाडय़ांचा समावेश आहे. भारतीय सेनादलाच्या चार चारचाकी गाडय़ांचाही यामध्ये समावेश आहे. दुचाकींच्या स्पर्धेत एकूण ३४ गाडय़ा धावतील.
या स्पर्धेसाठी एकूण दहा लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली असून, मारुती कंपनीच्या सुनीता धार यांनी झेंडा दाखवून रविवारी स्पर्धेची औपचारिक सुरुवात केली.        

साहसी स्पर्धेत मराठीचाही झेंडा
जगाच्या कानाकोपऱ्यात फडकलेला मराठीचा झेंडा या साहसी स्पर्धेतही फडकणार आहे. मुंबईच्या सुनील शेटय़े यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यांचे हे स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. ‘‘ही स्पर्धा भारतातील सर्वात खडतर स्पर्धा आहे, त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्यापेक्षा पूर्ण करण्यात जो आनंद मिळतो तो फार मोलाचा असतो. त्यामुळे हा थरार अनुभवण्यासाठीच मी या स्पर्धेत सहभागी झालो आहे,’’ असे शेटय़े यांनी सांगितले. त्याचबरोबर या स्पर्धेत पुण्याच्या सुरुची जोशी आणि ठाण्याच्या संपदा रांगणेकर यांनीही सहभाग घेतला आहे.