शिखर धवनचे शानदार शतक Print

पी.टी.आय.

चेन्नई
सलामीवीर शिखर धवन याचे शैलीदार शतक व त्याने राहुल दिवाण याच्या साथीत केलेल्या शतकी भागीदारीमुळेच दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर विभागाने पश्चिम विभागाविरुद्ध आश्वासक सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर उत्तर विभागाने ८९.२ षटकांत ३ बाद २५१ धावा केल्या.धवन याने दमदार फलंदाजी करीत १०१ धावा केल्या. कमलेश मकवाना याच्या षटकात यष्टिरक्षक पार्थिव पटेल याने त्याला यष्टिचित केले. दिवाण याने शैलीदार ६५ धावा करीत धवनला चांगली साथ दिली. या जोडीने सलामीकरिता १६४ धावांची भागीदारी केली.
दिवाण हा मकवानाच्या षटकात अजिंक्य रहाणेच्या हातात झेल देऊन तंबूत परतला. ही जोडी बाद झाल्यानंतर सनी सिंग व नितीन सैनी यांनीही आत्मविश्वासाने फलंदाजी करीत ७६ धावांची भर घातली. समाद फल्लाह याने सनी याला बाद करीत ही जोडी फोडली. सनी याने ४६ धावा केल्या. खेळ संपला त्या वेळी सैनी हा ३७ धावांवर खेळत होता.