क्रिकेटपटूंची फॅक्टरी! Print

पी. केणिंगा
alt

१७ मार्च १९९६ हा दिवस श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. कारण लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर अर्जुन रणतुंगाच्या क्रिकेट संघाने ‘न भूतो, न भविष्यति’ असा चमत्कार घडवीत विश्वविजेतेपद जिंकण्याची कर्तबगारी दाखवली. १९९६च्या विश्वचषक स्पध्रेत श्रीलंकेकडून अतिशय माफक अपेक्षा करण्यात येत होत्या. पण जे घडले ते क्रिकेटविश्वाला दखल घ्यायला भाग पाडणारे होते. तेथूनच श्रीलंकेच्या क्रिकेटच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विश्वविक्रमांवर श्रीलंकेचीच मोहोर आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचे विश्वविक्रम श्रीलंकेच्याच नावावर आहेत. श्रीलंकेच्या या विकासपर्वात अनेक क्रिकेटपटूंचा सिंहाचा वाटा आहे. रणातुंगा, अरविंदा डिसिल्व्हा, मुथय्या मुरलीधरन, सनथ जयसूर्या, चामिंडा वास, महेला जयवर्धने, कुमार संगकारा अशी अनेक नावे डोळ्यांसमोर येतात. भारताप्रमाणेच श्रीलंकेतही क्रिकेट ब्रिटिशांमुळे पोहोचले. १९४८मध्ये स्वातंत्र्य झालेल्या सिलोनचे १९७२मध्ये श्रीलंका असे नामकरण झाले, परंतु त्याच्या कित्येक वष्रे आधी १९२६-२७मध्ये कोलंबोच्या व्हिक्टोरिया पार्क परिसरात नोमॅड्स ग्राऊंडवर सिलोनने एमसीसीविरुद्ध पहिला प्रथम श्रेणी सामना खेळण्याचा मान मिळवला. तो सामना डावाच्या फरकाने एमसीसीने जिंकला होता. सिलोनने १९३२-३३मध्ये पतियाळाविरुद्ध आपला पहिला विजय नोंदवला होता. कोलंबो या शहरासह श्रीलंकेतील क्रिकेट हे अशा रीतीने बऱ्याच वर्षांचा इतिहास सांगते. एकटय़ा कोलंबोत २२ क्रिकेट मैदाने आहेत. आर. प्रेमदासा स्टेडियम, सिंहलीज स्पोर्ट्स क्लब, पी. सारा स्टेडियम आणि कोलंबो क्रिकेट क्लब अशी चार आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम्स असणारे कोलंबो हे एकमेव शहर आहे. याशिवाय कोलंबोत फेरफटका मारल्यास इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या कोल्ट्स क्रिकेट क्लब, एनसीसी अशा अनेक मैदानांचा परिचय होतो. कोलंबोतील या क्लब क्रिकेटचा श्रीलंकेच्या क्रिकेटच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. १९८१मध्ये श्रीलंकेला कसोटी क्रिकेटचा दर्जा लाभला. त्यानंतर १७ ते २२ फेब्रुवारी १९८२ यादरम्यान श्रीलंकेचा संघ पहिलावहिला कसोटी सामना कोलंबोच्या पी. सारा मैदानावरच खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंकेने भारताला हरवून ११ सप्टेंबर १९८५ या दिवशी पहिला कसोटी विजय याच ठिकाणी साजरा केला.
पश्चिमेच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले कोलंबो हे तसे राजधानीचे शहर. डच, ब्रिटिशकालीन वास्तव्याच्या पाऊलखुणा दर्शविणाऱ्या जुन्या वास्तू, नारळांची असंख्य झाडे, किनाऱ्याच्या सलगीने जाणारी रेल्वे आदी निसर्गरम्य वातावरणात कोलंबोचे क्रिकेट वाढले. श्रीलंकेतील शालेय क्रिकेटचा स्तर अतिशय उच्च दर्जाचा आहे. रणतुंगा जेव्हा कोलंबोच्या आनंदा महाविद्यालयात शिकत होता, तेव्हा तो श्रीलंकेकडून पहिली कसोटी खेळला होता. कोलंबोच्याच पी. सारा स्टेडियमवर तो ऐतिहासिक सामना झाला होता. श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याचे वास्तव्य जरी कॅन्डीला असले तरी कोलंबोच्या तामिळ युनियन क्रिकेट अ‍ॅण्ड अ‍ॅथलेटिक्स क्लबकडून तो खेळला. आकारमानाने भारतापेक्षा कित्येक पटीने या छोटय़ा श्रीलंका देशातून क्रिकेटपटूंची मोठी रसद निर्माण झाली आहे. त्यात मोलाचे योगदान असलेले साडेसात लाख लोकसंख्येचे कोलंबो म्हणजे तर क्रिकेटपटूंची फॅक्टरीच.