विच्छा माझी पुरी करा! Print

alt

रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
तीन आठवडय़ांच्या उत्कंठावर्धक प्रवासाचा रविवारी रात्री एखाद्या परीकथेप्रमाणे सुखद शेवट होणार आहे. अथांग समुद्रकिनारा आणि पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांकडून क्रिकेटचा वसा घेतलेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन निसर्गसंपन्न बेटांमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील जगज्जेतेपदासाठी महायुद्ध
रंगणार आहे. सुमारे दोनशे देशांमधील अब्जावधी क्रिकेटरसिकांना त्या सोनेरी क्षणाची उत्सुकता लागून राहिली आहे. आशियाई महासत्तेचे प्रतीक मानला जाणारा महेला जयवर्धनेचा श्रीलंकेचा संघ विश्वविजेतेपद जिंकून बीअर आणि नृत्याच्या जल्लोषात कार्निव्हल पार्टी करण्यासाठी उत्सुक आहे, तर डॅरेन सॅमीचा वेस्ट इंडिज संघ कॅरेबियन बेटांवर ‘कॅलिप्सो’ नृत्याच्या ठेक्यावर क्रिकेटचे सोनेरी दिवस पुन्हा आणण्यासाठी आसुसला आहे. रविवारी होणाऱ्या या युद्धाचे पडघम शनिवारपासून वाजू लागले होते. अर्थातच वाक्युद्धानेच त्याला प्रारंभ झाला.

‘‘विश्वचषक जिंकून जल्लोषमय पार्टी साजरी करण्याचे श्रीलंकेच्या संघाचे मनसुबे आम्ही हाणून पाडू,’’ असा इशारा वेस्ट इंडिजचा संघनायक डॅरेन सॅमीने दिला. शुक्रवारी रात्री उपांत्य सामन्यात कांगारूंची शिकार केल्यानंतर ख्रिस गेलने सिंहगर्जना केली होती की, ‘‘श्रीलंकावासीयांनो आम्हाला माफ करा, आम्ही विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये घेऊन जाणार आहोत.’’ त्याबाबत महेला जयवर्धने म्हणाला की, ‘‘कुणीतरी काहीतरी बोलत असेल, तर मला असे वाटते बोलणाऱ्यावर ते सिद्ध करण्याची जबाबदारी अधिक असेल.’’
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी जनता विश्वविजेतेपदासाठी कमालीचे भावुक झाले आहेत. कारण दोन्ही देशांना जगज्जेतेपदाचा मुकुट alt

बरीच वष्रे मिरवता आलेला नाही. वेस्ट इंडिजच्या संघाने १९७५ आणि १९७९ असे एकदिवसीय क्रिकेटमधील दोन विश्वचषकजिंकले, परंतु त्याशिवाय त्यांना कोणत्याही विश्वचषकात अंतिम फेरीतही पोहोचता आले नव्हते. २००४मध्ये इंग्लिश भूमीवर जिंकलेली चॅम्पियन्स ट्रॉफी, हे त्यांचे गेल्या काही वर्षांमधील मोठे यश. त्या तुलनेत श्रीलंकेची भरारी अधिक प्रभावी आहे. १९९६मध्ये साऱ्या क्रिकेटजगताला आश्चर्याचा धक्का देत एकदिवसीय क्रिकेटचे विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या श्रीलंकेने २००७ आणि २०११मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. याचप्रमाणे २००९च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण हा दुर्दैवाचा दशावतार संपवून विश्वविजयाचा सोनेरी मुकुट परिधान करण्यासाठी श्रीलंकेला घरच्या मैदानावर चांगली संधी चालून आली आहे.
ख्रिस गेल नामक त्सुनामी कशी प्रतिस्पध्र्याला बेचिराख करू शकते, याचा प्रत्यय शुक्रवारी ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाने घेतला. ‘गेल’ नामाचा जप करीत वेस्ट इंडिजच्या बाकीच्या खेळाडूंनीही आक्रमणाचे हत्यार स्वीकारले. त्यामुळे श्रीलंकेला गेलपासून सावध राहावे लागणार आहे. पण जयवर्धने मात्र निर्धास्त जाणवला. तो म्हणाला, ‘‘गेल हा विंडीजचा चांगला खेळाडू आहे. मात्र आम्ही एखाद्या खेळाडूवर कसे नियंत्रण मिळवावे, अशी रणनीती मुळीच आखत नाही. आम्ही संपूर्ण वेस्ट इंडिज संघाशी सामोरे जाण्याबाबतची योजना आखली आहे.’’
गेलचे महत्त्व लक्षात घेता, वेस्ट इंडिज संघानेही चांगलीच मानसिक तयारी केली आहे. ‘‘गेल हा संघाला चांगली सुरुवात करून देतो, पण गेल अपयशी ठरल्यावर वेस्ट इंडिजची एकंदर फलंदाजीची फळी अपयशी ठरू शकत नाही. आमच्या संघात आणखीही काही दर्जेदार फलंदाज आहेत,’’ असे सॅमीने स्पष्ट केले.
भन्नाट वेगाने गोलंदाजी करणारा लसिथ मलिंगा आणि मुथय्या मुरलीधरनचा वारसा सांगणारा फिरकी गोलंदाज अजंथा मेंडिस यांच्यावर गेलला काबूत आणण्याची जबाबदारी असेल. याचप्रमाणे महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा या श्रीलंकेच्या फलंदाजीची मदार असलेल्या त्रिमूर्तीवर अंकुश ठेवण्यासाठी रवी रामपॉल, सुनील नरिन सज्ज झाले आहेत.
 संघ -
श्रीलंका : महेला जयवर्धने (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूस, दिनेश चंडिमल, अकिला धनंजया, तिलकरत्ने दिलशान, शमिंदा इरंगा, रंगना हेराथ, न्यूवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, अजंठा मेंडिस, जीवन मेंडिस, दिलशान मुनावीरा, थिसारा परेरा, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने.
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, सॅम्युएल बॅड्री, डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, फिडेल एडवर्ड्स, ख्रिस गेल, सुनील नरिन, किरॉन पोलार्ड, दिनेश रामदीन, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, मार्लन सॅम्युएल्स, लेंडल सिमॉन्स, ड्वेन स्मिथ.    

श्रीलंकेचे जगज्जेतेपदाचे स्वप्न धूळीस मिळवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही ध्येय घेऊन या स्पर्धेसाठी श्रीलंकेत पोहोचलो. आता आम्हाला फक्त एकच अडथळा पार करावयाचा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इतके मोठे यश वेस्ट इंडिजच्या वाटय़ाला कधीच आले नाही. आम्ही या यशासाठी आसुसले आहोत
    - डॅरेन सॅमी
    वेस्ट इंडिजचा कर्णधार

आम्ही आमच्या क्षमतेच्या बळावर जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करू. ख्रिल गेलसारख्या धोकादायक फलंदाजाला रोखण्याची रणनीती आखावी लागणार आहे. देशवासीयांनी क्रिकेटचा यथेच्छ आनंद लुटला. आता श्रीलंकेच्या जनतेसाठी जगज्जेतेपदाचा अभिमानास्पद क्षण मिळवून देण्यासाठी मी आतुर आहे
- महेला जयवर्धने
श्रीलंकेचा कर्णधार

दिवस ज्यांचा, तोच जगज्जेता -जयवर्धने
कोलंबो : ‘‘भूतकाळात काय घडले याचा आम्ही विचार करीत नाही. आता आमची अंतिम फेरीच्या दृष्टीने तयारी चांगली झाली आहे. त्यामुळे आम्ही विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक आहोत. रविवारी अंतिम फेरीचा सामना रोमहर्षक होईल,’’ अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनेने व्यक्त केली.
‘‘कारकीर्दीतील सर्वोत्तम विश्वचषक स्पर्धा असे मी या स्पध्रेचे वर्णन करीन. सामने अतिशय रंगतदार झाले. सुपर ओव्हपर्यंत काही सामने रंगले. आता श्रीलंकेच्या जनतेसाठी जगज्जेतेपदाचा अभिमानास्पद क्षण मिळवून देण्यासाठी मी आतुर आहे,’’ असे जयवर्धने पुढे म्हणाला. ‘‘जगज्जेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेचे नेतृत्व करीत आहे, हा गर्वाचा क्षण आहे. रविवारी दोन्ही संघांना समान संधी आहेत. हा दिवस ज्या संघाला अनुकूल असेल, तो विश्वचषकावर नाव कोरेल,’’ असेही त्याने या वेळी सांगितले.

लॉइडच्या शाबासकीने सॅमी भारावला!
कोलंबो : ‘‘विश्वचषक जिंकणे हे कॅरेबियन बेटावरील क्रिकेटसाठी दिव्य यश ठरेल, कारण गेल्या काही वर्षांमध्ये इतके मोठे यश वेस्ट इंडिजच्या वाटय़ाला कधीच आले नाही. एक संघ आणि खेळाडू म्हणून या यशासाठी आम्ही आसुसले आहोत,’’ अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने व्यक्त केली.
‘‘श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावर खेळत आहे, त्यामुळे त्यांना खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. पण माझा आमच्या फिरकी माऱ्यावर विश्वास आहे,’’ असे सॅमीने सांगितले. विंडीजचे संघनायक क्लाइव्ह लॉइड यांनी ई-मेलद्वारे सॅमीच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत, हे सांगताना तो सद्गदित झाला होता. ‘‘कॅरेबियन बेटावरील क्रिकेटसाठी तुम्ही जे यश मिळवीत आहात, ते अभिमानास्पद आहे. हा प्रवास यशदायी ठरो’’, असा एसएमएस लॉइड यांनी पाठवल्याचे सॅमीने सांगितले.

विंडीजचा आतापर्यंतचा प्रवास
साखळी फेरी
वि. ऑस्ट्रेलिया : १७ धावांनी पराभूत
वि. आर्यलड :  सामना पावसामुळे रद्द
सुपर-एट फेरी
वि. इंग्लंड : १५ धावांनी विजयी
वि. श्रीलंका : नऊ विकेट्सनी पराभूत
वि. न्यूझीलंड : सुपर-ओव्हरमध्ये विजयी
उपांत्य फेरी
वि. ऑस्ट्रेलिया : ७४ धावांनी विजयी

श्रीलंकेचा आतापर्यंतचा प्रवास
साखळी फेरी
वि. झिम्बाब्वे : ८२ धावांनी विजयी
वि. द. आफ्रिका : ३२ धावांनी पराभूत
सुपर-एट फेरी
वि. न्यूझीलंड : सुपर-ओव्हरमध्ये विजयी
वि. वेस्ट इंडिज : नऊ विकेट्सनी विजयी
वि. इंग्लंड : १९ धावांनी विजयी
उपांत्य फेरी
वि. पाकिस्तान : १६ धावांनी विजयी