उत्तर विभागाचा धावांचा डोंगर Print

पश्चिमेची डळमळीत सुरुवात
पी.टी.आय.
चेन्नई
उत्तर विभागाने दुलीप ट्रॉफी चषकात पश्चिमेविरुद्ध ४८४ धावांचा डोंगर उभारला. शिखर धवनच्या शतकानंतर पारस डोगरा, रिशी धवन आणि अमित मिश्राच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे उत्तर विभागाने चारशेचा टप्पा ओलांडला. डोगराने १० चौकार आणि एका षटकारासह ७७ धावांची खेळी केली. रिशीने ५ चौकारांसह ३८ धावांची खेळी केली तर अमित मिश्राने २ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. या त्रिकुटाच्या मुक्त फटकेबाजीमुळेच उत्तर विभागाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
पश्चिम विभागातर्फे कमलेश मकवानाने पाच बळी टिपले. समद फल्ला आणि हरमीत सिंगने प्रत्येकी २ बळी टिपले. पश्चिम विभागाची सुरुवात खराब झाली. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आतुर मुंबईकर अजिंक्य रहाणे भोपळाही फोडू शकला नाही. इशांत शर्माने त्याला सैनीकरवी झेलबाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पश्चिम विभागाच्या १ बाद ६ धावा झाल्या आहेत. केदार पवार आणि मुर्तझा वोहरा नाबाद खेळत आहेत. पश्चिमेचा संघ ४७८ धावांनी पिछाडीवर आहे.