चेल्सीची हुकुमत Print

इंग्लिश प्रीमिअर लीग
वृत्तसंस्था
लंडन
चेल्सीने नॉर्विच सिटीचा ४-१ने धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले. फर्नाडो टोरेस, फ्रँक लॅम्पार्ड, इडन हॅझार्ड आणि ब्रॅनिस्लाव्ह इव्हानोव्हिच यांनी प्रत्येकी एक गोल करत चेल्सीला शानदार विजय मिळवून दिला.
अँटॉन फर्डिनांडला उद्देशून वर्णभेदी उद्गार काढल्याच्या प्रकरणात अडकलेला चेल्सीचा जॉन टेरी या सामन्यात सहभागी झाला होता. शुक्रवारी फुटबॉल संघटनेने या प्रकरणी त्रिसदस्यीय समितीचे निष्कर्ष जाहीर केले. टेरीला याआधीच चार सामन्यांची बंदी आणि २२,००० युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेल्सीने टेरी आणि चौकशीदरम्यान त्याच्या बाजूने साक्ष देणारा सहकारी अ‍ॅशले कोल यांना संघात समाविष्ट केले. या कशाचाही आपल्या खेळावर परिणाम होऊ न देता चेल्सीने दिमाखदार विजय मिळवला.
आतापर्यंत स्पर्धेत एकही विजय मिळवू न शकलेल्या नॉरविचला ११व्या मिनिटाला होल्टने गोल करत आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर चेल्सीच्या खेळाडूंनी ठराविक अंतराने गोल करत विजय संपादला.
अन्य सामन्यांमध्ये टॉटनहॅमने मँचेस्टर युनायटेडवर ३-२ असा निसटता विजय मिळवला तर दुसरीकडे मँचेस्टर सिटीने सदरलँण्डचा ३-०ने धुव्वा उडवला.
अलेक्झांडर कोलारव्ह, सर्जिओ ऑग्युरो आणि जेम्स मिल्नर यांनी सिटीतर्फे प्रत्येकी एक गोल केला. विगान आणि इव्‍‌र्हटॉन यांच्यातला सामना २-२ असा बरोबरीत सुटला.