पाकिस्तानच्या दौऱ्याला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हिरवा कंदील Print

क्रीडा प्रतिनिधी
कोलंबो
२००९मध्ये लाहोरमधील गदाफी स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणताही संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला नाही.
पाकिस्तानी क्रिकेटरसिकांचे आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याचे भाग्य तेव्हापासून नशिबाने हिरावून घेतले आहे. पण श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी मात्र पाकिस्तान दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या क्रिकेटला हिरवा कंदील दिला आहे. शनिवारी रात्री राष्ट्राध्यक्षांनी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.
राजपक्षे यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘‘श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याचा अंतिम निर्णय मात्र दोन्ही क्रिकेट मंडळांना घ्यायचा आहे. या दौऱ्याच्या तारखा आणि योजना दोन्ही मंडळांनी ठरवाव्यात. याबाबत आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये त्यानिमित्ताने परतत असेल, तर ती आनंदाची गोष्ट असेल.’’
२००९मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यामध्ये सहा पाकिस्तानी पोलीस आणि गाडीचा चालक ठार झाला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे पाच खेळाडू जखमी झाले होते.
पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत यावे, याकरिता पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळाशीही त्यांची दौऱ्याबाबत बोलणी सुरू आहे. याशिवाय जागतिक क्रिकेट संघाशी एखादा कराचीत सामना व्हावा, यासाठीही ते प्रयत्नात आहेत.