वेटेलला जेतेपद Print

जपान ग्रां. प्रि.

ए.एफ.पी.
सुझुका
गतविजेत्या सेबेस्टियन वेटेल याने जपान ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावल्यामुळे आता जगज्जेतेपदासाठीची शर्यत आणखीनच रंगणार आहे. दोन आठवडय़ांपूर्वी सिंगापूर ग्रां. प्रि. शर्यतीवर नाव कोरणाऱ्या वेटेलने या मोसमातील लागोपाठ दोन शर्यती जिंकण्याचा पराक्रम केला.  
ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये १९४ गुणांसह अव्वल स्थानी असलेल्या फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोपेक्षा वेटेल चार गुणांनी मागे आहे. लोटसच्या किमी रायकोनेन याने पहिल्या कॉर्नरजवळ फर्नाडो अलोन्सोच्या कारला धडक दिल्यामुळे अलोन्सोला अपघातामुळे शर्यतीतून माघार घ्यावी लागली. वेटेलने शर्यतीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत कारकीर्दीतील २४व्या जेतेपदाला गवसणी घातली.
फेरारीच्या फेलिपे मासाला दुसऱ्या तर सौबेरच्या कामुई कोबायाशी याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ३५ शर्यतींनंतर मासाने पहिल्यांदा अव्वल तीन जणांत स्थान मिळवले. मॅकलॅरेनचे ड्रायव्हर जेन्सन बटन आणि लुइस हॅमिल्टन यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान प्राप्त केले. लोटसच्या किमी रायकोनेन सहावा आला.
सहारा फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्ग याने विल्यम्सचा पास्तोर माल्डोनाडो आणि रेड बुलचा मार्क बेवर यांना मागे टाकून सातव्या क्रमांकावर झेप घेतली. टोरो रोस्सोच्या डॅनियल रिकाडरे याला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सात वेळा जगज्जेता ठरलेल्या आणि दुसऱ्यांदा फॉम्र्युला-वनमधून निवृत्ती पत्करलेल्या मायकेल शूमाकर याला अव्वल १० जणांमध्ये स्थान पटकावता आले नाही. तो ११व्या क्रमांकावर राहिला.