ऑस्ट्रेलियाच्या पोरी हुश्शार! Print

सलग दुसऱ्या विश्वविजेतेपदाला गवसणी

क्रीडा प्रतिनिधी
कोलंबो
अखेरच्या चेंडूपर्यंत झालेल्या रोमहर्षक लढतीत ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी इंग्लंडचा चार धावांनी पराभव केला आणि सलग दुसऱ्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. जेस कॅमरूनची दमदार फलंदाजी आणि लिझा स्थळेकरच्या अष्टपैलू खेळामुळे ऑस्ट्रेलियाला हा विजय साकारता आला. विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी मैदानावर जल्लोष साजरा केला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १४२ धावांचे आव्हान उभे केले. मेग लॅनिंग २५, अलिसा हिली २६, कॅमरून ४५ आणि स्थळेकर नाबाद २३ यांच्या आक्रमक फलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाला हे साध्य झाले. त्यानंतर इंग्लंड संघाने अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली. कप्तान चार्लट एडवर्ड्सने सर्वाधिक २८ धावा काढल्या. जेस जोनासनने ३ तर स्थळेकरने २ बळी घेत इंग्लिश फलंदाजांवर अंकुश ठेवला. कॅमरून सामनावीर आणि एडवर्ड्स मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
‘‘इंग्लंडने चांगली झुंज दिली. पण आमची अष्टपैलू कामगिरी सरस ठरली. आमचा संघाच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास होता. माझे देशाच्या जर्सीवर खूप प्रेम आहे. जेव्हा ती तुम्ही परिधान करता, तेव्हा तुम्हाला निर्धाराने लढायची ती प्रेरणा देते. विश्वविजेतेपदाचा मला अत्यंत अभिमान वाटत आहे’’, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाची कर्णधार जॉडी फिल्ड्सने सामन्यानंतर व्यक्त केली.