रम्य ही स्वर्गाहून लंका! Print

पी. केणिंगा

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलवणारं क्रिकेट म्हणजे ट्वेन्टी-२०. तब्बल २० दिवस श्रीलंकेच्या बेटावर जणू कार्निव्हलच सुरू होता. विश्वचषक जिंकण्याच्या ईष्रेने लढणारे १२ संघ, त्यांचे चाहते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी अनेक मंडळींची यानिमित्तानं श्रीलंकेच्या भूमीवर पावलं उमटली. क्रिकेट म्हणजे श्रीलंकेचं चैतन्य. या चैतन्याच्या बळावरच पर्यटनाच्या माध्यमातून श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला. श्रीलंकेत सध्या ३० दशलक्ष डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक आहे. या आकडय़ावरूनच श्रीलंकेच्या कणखरतेचा अंदाज येतो. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे श्रीलंकेच्या प्रगतीचंच लक्षण आहे.
या क्रिकेट दौऱ्यात श्रीलंकेचे नारळ्याच्या पाण्याप्रमाणे सात्त्विक नागरिक टप्प्याटप्प्यावर भेटले. त्यांची जगण्याची वृत्ती आणि शैली या साऱ्याला एक लय होती. शांतता आणि स्वच्छतेचा प्रत्यय रस्त्यारस्त्यावरच नव्हे, तर येथील गरिबांच्या झोपडपट्टी भागातही येत होता. मोत्यांच्या दागिन्यांची दुकाने आणि मसाज पार्लर यांच्याकडून मिळणाऱ्या वरकमाईपोटी पर्यटकांशी ‘टूकटूक’वाल्यांचा मधाळ संवाद हा नित्याचाच. पर्यटकांकडून होणारा धनलाभ हा आता इथल्या जीवनशैलीचा आधार झाला आहे. पोलीस आणि सैनिकांचा जागता पहारा देशावर आहे. वाहतुकीचेही सर्व नियम इथं चालक आणि रहिवासी इमानेइतबारे पाळतात. ७० टक्के जनता बौद्धधर्मीय असलेल्या या देशात गौतम बुद्धांना अभिप्रेत असलेली शांती सर्वत्र जाणवते.
पण काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती मुळीच नव्हती. सुमारे २६ वष्रे एलटीटीईचा हिंसात्मक मार्गानं लढा सुरू होता. २००९मध्ये एलटीटीईचा म्होरक्या वेलूपिल्लई प्रभाकरन्ला ठार करण्यात आलं. राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने एलटीटीईचा सारा दहशतवाद संपवून टाकला. पण क्रिकेटच्या बाबतीत कधीच सिंहली किंवा तामिळ हा भेदभाव झाला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये आठशे बळींचा विश्वविक्रम नावावर असलेला मुथय्या मुरलीधरन हासुद्धा तामिळच. याचप्रमाणे श्रीलंकेच्या क्रिकेटनं बाळसं धरलं ते तामिळ क्रिकेट अ‍ॅण्ड अ‍ॅथलेटिक्स क्लबच्या पी. सारा ओव्हल स्टेडियमवरच. श्रीलंका पर्यटकांच्या दृष्टीनं त्या काळात सुरक्षित मुळीच नव्हतं. एलटीटीईकडून कोणतं दहशतवादी कृत्य होईल, याचा नेम नसायचा. लष्कर रस्त्यावर सारखी टेहळणी करायचं. १९९६च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचं यजमानपदही भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियाई राष्ट्रांनी भूषविलं होतं. त्या वेळी कोलंबोत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ८० नागरिक ठार झाले होते आणि जखमींची संख्या तर अगणित होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजनं कोलंबोत सामने खेळण्यास नकार दिला होता, परंतु आशियाई अस्मिता टिकविण्यासाठी पाकिस्तानचे अव्वल क्रिकेटपटू श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंशी कोलंबोत एक मैत्रीपूर्ण सामना खेळले होते. या क्रिकेटमुळेच आशियाई एकात्मतेचं दर्शन घडतं. १९८७ (भारत-पाकिस्तान), १९९६ (भारत-पाकिस्तान-श्रीलंका) आणि २०११(भारत-श्रीलंका-बांगलादेश)मध्ये या आशियाई राष्ट्रांनी संयुक्तपणे यजमानपद भूषविलं आहे. २००९मध्ये पाकिस्तानमधील लाहोरच्या गदाफी स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी दहशतवाद्यांनी श्रीलंकन क्रिकेट संघाच्या बसवर केलेल्या हल्ल्यात पाच पोलीस ठार झाले होते आणि पाच क्रिकेटपटू जखमी झाले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने पाकिस्तानमध्ये झालेले नाहीत. आता ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेप्रसंगी राजपक्षे यांनी श्रीलंका क्रिकेट मंडळाला पाकिस्तान दौऱ्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.
याचप्रमाणे १२ एप्रिल १९८७ या दिवशी कोलंबो बसस्थानकानजीक झालेल्या बॉम्बस्फोटानंतरही न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना झाला होता. तसेच २४ जुलै २००१ या दिवशी एलटीटीईनं कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक घडविलेल्या बॉम्बस्फोटात १४ नागरिक ठार झाले होते, पण न्यूझीलंडचा संघ कडक सुरक्षा व्यवस्थेत दुसऱ्या दिवशी सामना खेळला होता. दहशतवाद हे आशियाई राष्ट्रांपुढील महत्त्वाचं आव्हान. त्या पाश्र्वभूमीवरही क्रिकेट टिकून आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध चांगले नसतानाही क्रिकेटच्या धाग्यानं हे दोन देश नेहमीच जोडले जातात. सुदैवानं श्रीलंकेतील दहशतवादाचा पूर्णत: नायनाट होऊन आता क्रिकेटरसिक असोत वा पर्यटक, साऱ्यांना निर्भयपणे कुठंही फिरता येत आहे.
हॉटेलवरून कोलंबो एअरपोर्टपर्यंतच्या प्रवासात मावळतीच्या सूर्यानं आणि समुद्रकिनाऱ्यानं बरीच सोबत केली, पण विशाल समुद्राकडे पाहून ‘ने मजशी ने, परत मातृभूमीला..’ या गीतामध्ये किंचित बदल करून ‘मज नेऊ नको मातृभूमीला..’ असं काहीसं म्हणावंसं वाटलं! कोलंबो विमानतळावर पाय जडावल्यासारखे झाले होते. श्रीलंकेत घालवलेले १२ दिवस निसर्गाच्या सान्निध्यातील क्रिकेटमय होते. त्यामुळेच या देशाशी ऋणानुबंध जुळले होते. कारण आकाशात रंगांच्या अनेक छटा उमटवणाऱ्या निळ्याशार समुद्रकिनाऱ्यानं मनावरही ठसा उमटवला होता. त्यामुळेच ‘रम्य ही स्वर्गाहून लंका..’ हे गीत ओठांवर गुणगुणतच मी भारताचा प्रवास सुरू केला.
(समाप्त)