गाभ्रीचा पाऊस Print

‘गाभ्रीचा पाऊस’.. अशा आशयाचंच काहीसं भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी वैतागून म्हणाला. पण हा काही पावसाच्या रम्यतेचं वर्णन करणारा शब्द मुळीच नव्हता, तर पावसाला हासडलेली शिवी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर पावसाला जबाबदार धरणाऱ्या धोनीचं क्षणभर कौतुक वाटत होतं. पण २००७च्या विश्वविजेतेपदानंतर सलग तिसऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत सुपर-एटचा अडथळा पार करता आला नाही तर आपलं कर्णधारपद खालसा होईल, याची त्याला पक्की कल्पना होती. त्यामुळेच त्याला खापर फोडण्यासाठी पाऊस जवळचा वाटला. ‘डर्टी पिक्चर’मध्ये एक छान डायलॉग आहे. ‘फिल्में सिर्फ तीन चीझों की वजह से चलती है - इंटरटेन्मेंट, इंटरटेन्मेंट, इंटरटेन्मेंट..’ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं तर हीच त्रिसूत्री आत्मसात करावी लागते. नेमक्या याच गोष्टीचा धोनीला विसर पडला असावा. धोनी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग आणि लक्ष्मीपती बालाजी असे तिशी ओलांडलेले सात खेळाडू भारतीय संघात होते. ट्वेन्टी-२० क्रिकेट हे सळसळणाऱ्या तरुण रक्ताचं क्रिकेट मानलं जातं. पण व्यक्तिपूजेचं स्तोम असणाऱ्या भारताचा अर्धा संघ त्यांच्या अनुभवाच्या बळावर निवडण्यात आला होता. ट्वेन्टी-२० या क्रिकेट प्रकाराकडे बाकीचे देश ज्या पद्धतीनं पाहत आहेत, त्या पद्धतीनं भारत कधी पाहायला शिकणार, हा पहिला प्रश्नच पुढील बरीच वष्रे अनुत्तरित राहणारा आहे. धोनीकडे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही संघांचं कर्णधारपद आहे. नव्या पद्धतीनं पाहायचंच ठरवलं तर त्याला तिन्ही प्रकारांचं कर्णधारपद टिकविणं धोनीला मुश्कील जाऊ शकतं.
ट्वेन्टी-२० हा म्हटलं तर नशिबाचा खेळ आणि म्हटलं तर जुगार. कोणता खेळाडू आणि कोणता संघ कधी चमकेल, याचा काही नेम नाही. आता हेच पाहा वेस्ट इंडिजचा संघ गटांच्या साखळीत एकही सामना जिंकला नाही. आर्यलडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना एकेक गुण मिळाला. त्यानंतर सरासरीच्या बळावर हा संघ सुपर-एटमध्ये पोहोचला. याच सरासरीच्या समीकरणानं भारताचा पत्ता कट केला. सुपर-एटच्या दुसऱ्या गटातील ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत या दोन्ही संघांच्या खात्यावर प्रत्येकी दोन विजयांसह चार गुण जमा होते. पण नशिबाचं गणित चुकलं आणि भारताचा मार्ग सुपर-एटमध्येच खुंटला. पण भारताच्या एकंदर कामगिरीचा विचार करता नैराश्यमय परिस्थिती नक्कीच नाही. भारतानं विश्वचषकातील पाच सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव सामना वगळता बाकी चारही सामने जिंकले.
भारताच्या कामगिरीचं विश्लेषण करताना अनेक मुद्दे समोर येतात. भारताचा कप्तान कोणतेही निर्णय घेताना आत्मविश्वासानं त्याला सामोरं जात नव्हता. त्यामुळेच पाच गोलंदाजांसह खेळायचं की चार गोलंदाज घेऊन कामचलाऊ गोलंदाजांवर विश्वास टाकायचा, या द्विधा मन:स्थितीतून तो अखेपर्यंत बाहेर पडू शकला नाही. सुपर-एटच्या अखेरच्या सामन्यात आर. अश्विनच्या सोबतीला हरभजन सिंगची उणीव तीव्रतेनं भासली. तो असता तर कदाचित अखेरच्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेचं शेपूट लांबलं नसतं. ते लांबलं म्हणूनच तर भारताचं समीकरण बिघडलं.
उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चारही संघांच्या यशाचं रहस्य चांगल्या सलामीत दडलं आहे. भारताला पाचही सामन्यांत चांगली सलामी मिळू शकली नाही. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि द. आफ्रिकेविरुद्ध अनुक्रमे १५, १ आणि २३ धावांची सलामी दिली, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध गंभीरने इरफान पठाणसोबत अनुक्रमे २४ आणि २१ धावांची सलामी दिली. ५ सामन्यांत गंभीरच्या खात्यावर १६च्या सरासरीनं ८० धावा जमा आहेत, तर ३ सामन्यांत खेळणाऱ्या सेहवागच्या खात्यावर १८च्या सरासरीनं ५४ धावा जमा आहेत. हे चित्र अजिबात समाधानकारक नाही. त्याऐवजी आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या युवा अजिंक्य रहाणेला संधी देता आली असती. विराट कोहलीनं आपलं धावांचं सातत्य विश्वचषकातही टिकविल्याचं दिसून आलं. पण एकटय़ा विराटच्या बळावर भारत किती दिवस धावांचे इमले बांधणार आहे, हाही एक प्रश्नच आहे. बाकी सुरेश रैना, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी alt
यांनी आपली कामगिरी चोख बजावली. युवराज सिंगही चांगला खेळला. पण गेल्या वर्षी भारताच्या जगज्जेतेपदाचा शिल्पकार असलेला युवी हा नव्हेच, हे मात्र त्याच्या कामगिरीतून वारंवार अधोरेखित होत होतं. भारतीय निवड समितीनं भावनेच्या भरात त्याला संधी देण्यात घाई केली, हेच यातून प्रकट होतं.
भारताचा वेगवान आणि फिरकी हा दोन्ही मारा कोणत्याही सामन्यात सक्षम वाटला नाही, असे भारताच्या गोलंदाजांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यावर सहज लक्षात येतं. लक्ष्मीपती बालाजीनं ४ सामन्यांत ९ बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. पण त्यासा साथ ना इरफान पठाण देऊ शकला, ना झहीर खान. पठाणला ५ सामन्यांत फक्त ५ बळी मिळाले. अष्टपैलू खेळाडूचं ‘ट्रम्प कार्ड’ अजून किती दिवस पठाण चालवणार? सर्वात गहन प्रश्न हा झहीरचा आहे. ४ सामन्यांत फक्त ३ बळी, तेही अखेरच्या सामन्यात. बाकीच्या सर्व सामन्यांत पाटी कोरी. वसिम अक्रमनंही भारताच्या वेगवान माऱ्यावर टीका केली होती. वरुण आरोन आणि उमेश यादव यांसारख्या युवा गोलंदाजांना भारतीय संघात स्थान का मिळू शकलं नाही, असा सवालही त्यानं विचारला होता.
ज्या मैदानांवर पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज इतकंच कशाला दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे संघही फिरकीची ताकद ओळखूू शकले, त्या खेळपट्टीचा भारताला यथोचित आदर राखता आला नाही. आर. अश्विननं ४ सामन्यांत ५ बळी घेतले, तर कमी संधी मिळालेल्या हरभजननं २ सामन्यांत ४ बळी घेतले. पीयूष चावलालासुद्धा २ सामन्यांत २ बळी मिळाले. फिरकीला नंदनवन मानल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर ही भारतीय फिरकीची शोकांतिकाच म्हणायला हवी. पण कामचलाऊ फिरकी गोलंदाज युवराज सिंगनं या सर्वापेक्षा चांगली गोलंदाजी केली. त्यानं ५ सामन्यांत ८ बळी घेतले.
‘‘खेळपट्टीवर चेंडू टप्पा पडल्यावर तो कसा उसळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना कठीण जात होतं’’, असं कारण धोनीनं एका सामन्यानंतर भारतीय क्षेत्ररक्षणाची पाठराखण करताना दिलं होतं. पण धोनीव्यतिरिक्त बाकी कोणत्याही देशाच्या कर्णधारानं क्षेत्ररक्षणाबाबत असं कारण दिलं नव्हतं. याशिवाय सेहवाग आणि झहीरला क्षेत्ररक्षणात कुठं लपवावं, हा प्रश्न नेहमीच धोनीला पडत असावा. कारण या दोघांचंही स्थूल झालेलं शरीर या ट्वेन्टी-२०च्या वेगाशी जुळत नाही. भारतीय संघ तंदुरुस्ती राखण्यासाठी सरावात फुटबॉल हमखास खेळतो. त्यात फारसं पळावं लागू नये म्हणून सेहवाग गोलरक्षकाची भूमिकाच बजावताना दिसून येतो.
भारतीय क्रिकेटनं ट्वेन्टी-२० विश्वषक जिंकला, मग आयपीएल आलं. या आयपीएलची प्रारंभीची पर्व भारतीय क्रिकेटला अनुकूल ठरली. पण आता त्या आयपीएलची ‘फळे रसाळ गोमटी’ अन्य देशांना लाभदायक ठरत आहेत. ख्रिस गेल, जेम्स फ्रँकलिन, शेन वॉटसन, ब्रेंडन मॅक्क्युलम, महेला जयवर्धने, फॅफ डय़ू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, मॉर्नी मॉर्केल आणि लसिथ मलिंगा अशी अनेक उदाहरणं देता येतील. त्यामुळे २०१४मध्ये बांगलादेशला होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचं लक्ष्य साधायचं असेल तर भारतीय क्रिकेट प्रशासनाला या सर्व गोष्टींचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे.