कॅरेबियन नाइट्स! Print

* वेस्ट इंडिजने ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदावर प्रथमच नाव कोरले * चौथ्यांदा विश्वचषकाने हुलकावणी दिल्याने श्रीलंकेवर शोककळा
* सामनावीर : मार्लन सॅम्युएल्स * स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : शेन वॉटसन  * स्पर्धेतील सर्वोत्तम महिला खेळाडू : चार्लोट एडवर्ड्स

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
‘‘श्रीलंकावासियांनो आम्हाला माफ करा, आम्ही विश्वचषक कॅरेबियन बेटांवर घेऊन जाणार आहोत,’’ हे ख्रिस गेलचे बोल वेस्ट इंडिजच्या संघाने खाली पडू दिले नाहीत. लसिथ मलिंगाने मारलेला उंच फटका ड्वेन ब्राव्होच्या हातात विसावला आणि वेस्ट इंडिजच्या अभूतपूर्व आणि अविस्मरणीय जल्लोषाला प्रारंभ झाला. कॅरेबियन वीरांनी तब्बल ३३ वर्षांनी क्रिकेटमधील जगज्जेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

अत्युच्च आनंदाने त्यांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर तेथे सुरू झालेल्या अविरत जल्लोषाला लय आणि ठेका मिळाला तो वेस्ट इंडिजच्या लाडक्या ‘कॅलिप्सो’ नृत्याचा. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या बरोब्बर विसाव्या दिवशी वेस्ट इंडिजने विश्वविजेतेपदावर आपली मोहोर उमटवत आर. प्रेमदासा स्टेडियममधील त्या रात्रीचे रुपांतर जणू ‘कॅरेबियन नाइट्स’मध्ये केले!
वेस्ट इंडिज संघनायक डॅरेन सॅमीने जेव्हा कौतुकानं विश्वचषक उंचावला, तेव्हा साऱ्या क्रिकेटजगताला त्याचा हेवा वाटला. आकाशात फटाक्यांची उधळण होत होती. सोनेरी कणांच्या वर्षांवाने आसमंतात एक प्रकारचा विजयी कैफ होता. श्ॉम्पेनच्या वर्षांवात संपूर्ण संघ विश्वचषकाचा सोनेरी आनंद साजरा करीत होता. साऱ्यांचे पाय या विश्वविजयाच्या सूरांवर थिरकत होते. त्यानंतर आर. प्रेमदासा स्टेडियमवर वेस्ट इंडिज संघाने आपल्या कॅलिप्सो शैलीतच विजयी फेरी मारली. खांद्यावर देशाचा राष्ट्रध्वज आणि जिंकलेला विश्वचषक हा आनंद म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्यभराचा ठेवाच होता. ख्रिस गेलने विश्वविजेतेपदाच्या छायाचित्रणाप्रसंगीही आपल्या कॅलिप्सो कसरती करून दाखविल्या.
यजमान श्रीलंकावासी मात्र नेमक्या याचवेळी शोकसागरात आकंठ बुडाले होते. श्रीलंकेचे एकेक फलंदाज बाद होत होते, तसतसे मैदानावर मोठय़ा संख्येने जमलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेटरसिकांचे हृदयाचे ठोके वाढत होते. श्रीलंकेच्या डावाला पूर्णविराम मिळाला, तेव्हा सारे क्षणभर स्तब्ध झाले. मग कॅरेबियन नाइट्सच्या कॅलिप्सोमध्ये त्यांना मुळीच रस नव्हता. फक्त तीन मिनिटांत अध्रे स्टेडियम रिकामे झाले. गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा त्यांचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले होते. २००७ आणि २०११मध्ये एकदिवसीय तर २००९ आणि यंदा त्यांना ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मार्लन सॅम्युएल्स सामनावीर तर शेन वॉटसन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकल्यावर अपेक्षेप्रमाणेच वेस्ट इंडिजने फलंदाजी स्वीकारली. पण ख्रिस गेल नावाचे वादळ घोंगावलेच नाही. अजंथा मेंडिसने फक्त ३ धावांवर गेलला alt

तंबूचा मार्ग दाखवला. पण गेलच्या सावध पवित्र्यामुळे विंडीजचा धावांचा ओघ विलक्षण मंदावला होता. ५ षटकांत १ बाद १२, १० षटकांत २ बाद ३२ अशी केविलवाणी धावसंख्याही वेस्ट इंडिजच्या धावफलकावर लागली होती. पण हे मार्लन सॅम्युएल्सला मुळीच मंजूर नव्हते. त्याने मग आक्रमणाला प्रारंभ केला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा त्याच्या भक्ष्यस्थानी पडला. सॅम्युएल्सने मलिंगाला एकंदर सहा षटकार ठोकले. सॅम्युएल्सने ड्वेन ब्राव्होसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली. सॅम्युएल्सने ५६ चेंडूंत ३ चौकार आणि ६ षटकारांनिशी ७८ धावांची खेळी साकारली.
श्रीलंकेच्या डावात तिलकरत्ने दिलशानने निराशा केल्यानंतर महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी रचली. पण ही भागीदारी फुटली आणि श्रीलंकेच्या फलंदाजीची टायटॅनिकसारखी अवस्था झाली. न्यूवान कुलसेकराने रवी रामपॉलवर हल्ला चढवून क्षणभर आशा दाखवली. पण अखेपर्यंत श्रीलंकेच्या डावाला स्थर्यच मिळवता आले नाही. अखेर १०१ धावांवर त्यांचा डाव आटोपला. फिरकी गोलंदाज सुनील नरिनने ९ धावांत तीन बळी घेतले.
 संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : २० षटकांत ६ बाद १३७ (मार्लन सॅम्युएल्स ७८, डॅरेन सॅमी नाबाद २६; अजंथा मेंडिस ४/१२, अँजेलो मॅथ्यूेस १/११) विजयी विरुद्ध श्रीलंका : १८.४ षटकांत सर्व बाद १०१ (महेला जयवर्धने ३३, नुवान कुलसेकरा २६; सुनील नरिन ३/९, डॅरेन सॅमी २/६).    

जयवर्धनेने ट्वेन्टी-२०चे कर्णधारपद सोडले
कोलंबो : अंतिम फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर यजमान श्रीलंकेचे विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न चौथ्यांदा हुकले. त्यामुळे पराभवानंतर महेला जयवर्धने याने श्रीलंका ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडून देण्याची घोषणा सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत केली. एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदाविषयी मात्र बोलणे त्याने टाळले. मात्र निवड समिती आणि कर्णधार यांची अनुकूलता असल्यास यापुढे ट्वेन्टी-२०मध्ये खेळणार असल्याचेही त्याने सांगितले.     

वेस्ट इंडिजला कीर्ती मिळवून देण्यासाठी मी खेळलो नाही. तर कॅरेबियन लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी खेळलो. हे जेतेपद कॅरेबियन लोकांनाच समर्पित करतो.
- डॅरेन सॅमी
वेस्ट इंडिजचा कर्णधार