महिला हॉकी : भारताला सातवे स्थान Print

पी.टी.आय. डब्लीन

महिलांच्या चॅम्पियन्स चॅलेंज वन हॉकी स्पर्धेत भारतास सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांनी हे स्थान मिळविताना वेल्स संघाचा ४-० असा पराभव केला. एकतर्फी झालेल्या लढतीत भारताने मध्यंतराला ३-० अशी आघाडी घेतली होती. पूनम राणी हिने जोरदार चाल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर अनुपा बार्ला हिने संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. रितू राणी हिने मध्यंतरापूर्वी भारताचा आणखी एक गोल नोंदविला. मध्यंतरानंतर सामन्याच्या ४७ व्या मिनिटाला लिली चानु मयेंग्मबम हिने भारताचा चौथा गोल केला. वेल्स संघास आठवे स्थान मिळाले. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अमेरिकेचा ६-१ असा पराभव करीत विजेतेपद मिळविले आणि चॅम्पियन्स चॅलेंज अव्वल श्रेणी स्पर्धेत प्रवेश केला. आर्यलडने कांस्यपदक मिळविताना स्कॉटलंड संघाचा टायब्रेकरद्वारा ४-३ असा पराभव केला.